कलेक्टर बनण्यासाठी फक्त १०० रुपये लागतात !

म्हाळगी व्याख्यानमालेत प्रा. डॉ. काठोळे यांनी उलगडले ‘स्पर्धा परिक्षांचे आव्हान’

ठाणे : डॉक्टर बनायला दोन कोटी, इंजिनिअर बनायला ५० लाख लागतात. अन, कलेक्टर व्हायला मात्र अवघे १०० रुपयेच लागतात, अशी माहिती देत मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी ‘स्पर्धा परिक्षांचे आव्हान’ सुलभ करून सांगितले. आपल्याकडे याबाबत पुरेशी जनजागृतीच होत नसल्याने पालकांना आणि मुलांना याची माहितीच नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

ठाण्यात आयोजित ३७व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प बुधवारी सरस्वती शाळेच्या पटांगणात मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी गुंफले. यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष सुहास पाटील, ऋषीकेश दंडे आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ.संजय केळकर उपस्थित होते. श्रोत्यांमध्ये भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आ.निरंजन डावखरे, माधुरी मेटांगे, माजी उपमहापौर सुभाष काळे, विद्याधर वैशंपायन, प्रा.किर्ती आगाशे आदीसह नागपूर, सातारा येथील काही मान्यवर आवर्जुन उपस्थित होते.

डॉ. काठोळे यांनी उपस्थितांना केलेल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षाविषयी असलेली भीती आणि न्युनगंड घालवून सकारात्मकता जागृत करुन जोषपूर्ण आवाहन केले. यावेळी त्यांनी शेरोशायरी तसेच संतवचने सांगून भारतीय नागरी सेवेंतर्गत आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची परिक्षा देण्यासाठी अभ्यासाच्या सोप्या पद्धती आणि त्यातील बारकावे समजावून सांगितले. आयएएसची परिक्षा देण्यासाठी ३५ टक्के गुण आवश्यक असून पूर्वपरिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी फक्त २५ टक्के गुण आवश्यक असतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोजचे काम रोजच करा. स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी दररोज ३० प्रश्न सोडवणे गरजेचे असल्याचे प्रा. काठोळे यांनी सांगितले. त्याचबरोबर दररोजची वर्तमानपत्रे वाचून त्यातील माहिती फाईलमध्ये ‘एबीसीडी… अशी अल्फाबेटनुसार संकलित करा. यामुळे तुमचे सामान्य ज्ञान अद्ययावत राहते. जी मुले ५ वी ते १२ वी पर्यंतचा अभ्यास काळजीपूर्वक करतात, ते आयएएस परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात. कारण त्यांचा बेस पक्का झालेला असतो. तेव्हा, वेळेचे योग्य नियोजन करा. एक रुटीन तयार करा आणि त्याप्रमाणे तयारी करा. अनावश्यक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका, असे प्रबोधन करताना प्रा. काठोळे यांनी, ” पंख होने से कुछ नही होता, हौसलो से उडान होती है । हा शेर आवर्जुन श्रोत्यांना सांगितला.