उत्तर अमेरिका बीएमएम अध्यक्ष ‘ठाणेवैभव’ कार्यालयात

ठाणे : अमेरिकेत स्थायिक मराठी बांधवांची मराठी संस्कृतीशी नाळ जपण्यासाठी विविध उपक्रम राबवणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळ (बीएमएम) उत्तर अमेरिका या संस्थेचे अध्यक्षा संदीप दीक्षित यांनी आज ‘ठाणेवैभव’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. संपादक मिलिन्द बल्लाळ यांच्याशी तासभर झालेल्या या भेटीत सविस्तर चर्चा झाली.

बीएमएमची स्थापना 1981 मध्ये झाल्याचे सांगून श्री. दीक्षित यांनी मंडळातर्फे मराठी भाषिक बांधवांच्या मुलांसाठी रविवारच्या शाळा भरवल्या जात असल्याचे सांगितले. तिथे मराठी संस्कृती आणि भाषा याचे ज्ञान दिले जाते असे ते म्हणाले. ज्येष्ठ नागरीकांसाठी उत्तररंग, लग्न जमवण्यासाठी रेशीमगाठी, अमेरिकन जीवनपद्धतीची ओळख करुन देण्यासाठी ‘लाईफस्टाईल’ वर्ग आदी उपक्रम राबवले जात असल्याचे श्री. दीक्षित यांनी सांगितले.

ठाण्याच्या सुरवाणी संस्कृत पाठशाळेच्या मदतीने बीएमएम अमेरिकन मराठी बांधवांना पौरोहित्याचे प्रशिक्षण देत आहे. श्री. दीक्षित यांच्या समवेत सुरवाणीच्या उपाध्यक्ष शिरीक्ष अत्रे आणि प्रधान आचार्य ऋतुजा वेलणकर होत्या.

जून 2024 मध्ये बीएमएमचे संमेलन भरवण्यात येणार असून विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री यांच्याशी भावी योजनांबाबत चर्चा सुरू असल्याचे श्री. दीक्षित यांनी सांगितले.