ठाणे रेल्वे स्थानकात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू

१०० किलो कंपोस्ट खतही होणार तयार

ठाणे: मध्य रेल्वेतर्फे बुधवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, रेल्वे वसाहत, कार्यालये, रुग्णालय आणि अन्य संस्थांमधून दररोज निर्माण होणाऱ्या ४५ किलोलिटर सांडपाण्यावर या प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे.

सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक (मुंबई विभाग) अमरेंद्र सिंग यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी, अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि व्हिटवायोटिक्सचे उपाध्यक्ष रोहित शेलटकर तसेच हा प्रकल्प स्थापित करणारी कंपनी मेयर ऑरगेनिक्सचे संचालक राजेश तावडे आणि उमा कालेकर यांची उपस्थिती होती.

मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक (मुंबई विभाग) अमरेंद्र सिंग यावेळी म्हणाले, हा प्रकल्प ठाणे मध्य रेल्वे संकुलाला शून्य कचरा, शून्य सांडपाण्याची सुविधा बनवेल. या संकुलामुळे ठाणे पालिकेच्या आधीच ताणलेल्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांवरील भार हलका होईल. शिवाय महापालिकेच्या पाण्याचा वापर देखील ६० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यात भर म्हणजे रेल्वेच्या बागेत आणि निवासी वसाहतींमध्ये वापरण्यासाठी दर महिन्याला अंदाजे १०० किलो कंपोस्ट खत तयार केले जाईल.

उपाध्यक्ष रोहित शेलटकर म्हणाले, या प्रकल्पामुळे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दररोज ४० ते ४५ किलोलिटर पाण्याची बचत केली जाईल आणि शहराच्या वापरासाठी दर महिन्याला १०० किलो नैसर्गिक कंपोस्ट खत तयार होईल.

ठाणे रेल्वे स्थानक संकुलातून मिळवलेले ४० केएलडी पुनर्वापरयोग्य पाणी बागकाम, प्लॅटफॉर्म आणि रेल्वे डबे धुण्यासाठी, स्वच्छतागृहांमध्ये वापरले जाईल व या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची बचत होईल. प्रकल्पातून तयार होणारे कंपोस्ट खत रेल्वेच्या बागा आणि नर्सरीमध्ये वापरले जाईल आणि पॅकबंद करून ते रेल्वे कर्मचान्यांना त्यांच्या परस बागांमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.