ठाण्याच्या ‘मोबाईल वुमन कॉप्स’ने दिले प्रशिक्षण
ठाणे : ‘सध्याच्या धावपळीत, दगदगीत प्रत्येकजण आपला मोबाईल जीवापाड जपतो, त्याची निगराणी करतो आणि महत्वाचे म्हणजे तो हरवूच नये किंवा गायब न होणे असे वाटत असते. हरवलेला मोबाईल महत्प्रयासाने शोधून तक्रारदाराला परत दिल्यावर त्याचा आनंद अवर्णनीय असतो, असे आत्तापर्यंत ७०५ मोबाईल संचांचा शोध लावलेल्या ठाणे पोलीस दलाच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यातील मोबाईल वुमन कॉप्स’ महिला हवालदार यशोदा चंद्रकांत घोडे म्हणाल्या.
संबंधितांचा मोबाईल त्यांना परत मिळवून दिल्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला जातो आणि त्यांना महत्वाची कागदपत्रे घेऊन पोलीस स्थानकात येण्यास सांगितले जाते. त्यांच्या हाती मोबाईल दिल्यानंतर चेह-यावर फुलणारा आनंद अवर्णनीय असतो आणि मलाही मनोमनी चांगले काम केल्याचे समाधान वाटते, असे त्यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले. यशोदा घोडे यांची ही ख्याती, किर्ती ही सर्वोत्तम असलेल्या मुंबई पोलिसांच्या मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिल कुंभारे यांच्यापर्यंत पोहचली आहे.
श्री. कुंभारे यांनी गुरुवारी 05 जानेवारी रोजी मध्य प्रादेशिक विभागाच्या मुंबई कार्यालयातील सभागृहामध्ये उपस्थित राहून मुंबई अंतर्गत पोलीस ठाण्यांमधील सात पोलीस अधिकारी आणि 26 पोलीस अंमलदार यांना सकाळी 11 ते दुपारी एक वाजेपर्यंत या वेळेत हरविलेल्या तसेच गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध सी.डी.आर आणि एस.डी.आर यांचे तांत्रिक विश्लेषण तसेच “सीईआयआर.जिओव्ही” या संकेतस्थळावरून कशाप्रकारे घेण्यात यावे , याबाबतचे अतिउत्कृष्ट प्रशिक्षण दिले याबद्दल आम्ही आभारी आहोत, अशा शब्दात घोडे यांची प्रशंसा केली. श्रीमती घोडे यांनी भविष्यातसुद्धा अशा प्रकारे चांगली कामगिरी करावी, अशा सदिच्छासह खास प्रमाणपत्र श्री. कुंभारे यांनी त्यांना दिले.
ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ ५ वागळे इस्टेट येथील वर्तकनगर पोलीस स्टेशननेही मोबाईल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक आयुक्त निलेश सोनावणे, वर्तकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम आणि यशोदा घोडे आदी उपस्थित होते. यावेळी एकूण ४१ मोबाईल संच संबंधितांना देण्यात आले.
सन २०१९ मध्ये वर्तकनगर भागात राहणा-या घोडे यांनी पोलीस दलात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्याकडे २०२० पासून हरवलेले, चोरी केलेले मोबाईल संच शोधून देण्याची जबाबदारी देण्यात आली. हरवलेले मोबाईल शोधणे म्हणजे, ‘वाळुमध्ये सुई’ शोधण्यासारखे आहे.ही जणू मोहिम आहे, असे समजून मी ती व्यवस्थित पार पाडते. संचाचा शोध घेताना तांत्रिक बाबींचा वापर करावा लागतो. त्यानुसार संबंधितांचा पत्ता शोधणे आदी बाबी कराव्या लागतात. काहीजण येथे राहणारे असतील तर त्यांच्याशी लगेच संभाषण होते व त्यांना संच परत देतो. पण कोणी परराज्यात असल्यास त्यांचा ठावठिकाणा शोधण्याची पराकाष्ठा करावी लागते. मात्र हे काम मी ड्युटीच्या पलिकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने करते,असे घोडे यांनी “ठाणेवैभव”ला सांगितले.