निखिल बल्लाळ यांचा विद्यार्थ्यांना गोड सल्ला
ठाणे : सोशल मीडियावर लाईक्सच्या आहारी जाऊ नका. हजारो लाईक्स मिळवण्यापेक्षा पालक आणि शिक्षकांच्या लाईक्स मिळवण्याचा प्रयत्न करा, असा गोड सल्ला ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कळवा येथील सहकार विद्या प्रसारक संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम थाटात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले निखिल बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमोल भानुशाली यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
निखिल बल्लाळ पुढे म्हणाले, आपल्या विचारांचे रूपांतर शब्दात होते, शब्दाचे कृतीत, कृतीचे सवयींमध्ये, सवयींचे चारित्र्यात आणि चारित्र्याचे आपल्या प्रारब्धात रूपांतर होते, असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाचा वापर आवश्यकतेपुरताच करा. लाइक्सच्या आहारी जाऊ नका. हजारो लाईक मिळवण्यापेक्षा पालक, शिक्षक यांच्या लाईक मिळवायचा प्रयत्न करा. शिक्षकांचा रोल आपल्या आयुष्यात खूप मोठा आहे. कोरोनानंतर संगणकच सर्व काही असे सर्वांना वाटू लागले पण संगणक हे केवळ माहिती देते ज्ञान शिक्षक देत असतात, त्यामुळे या ज्ञानदूतांची पूजा करा, असे देखील श्री. बल्लाळ म्हणाले.
दिवसातून एकदा तरी आपल्या आई-वडिलांची विचारपूस करा. चांगला आहार आणि नियमित व्यायाम करा. उत्तम आरोग्य हीच खरी जीवनशैली, असे डॉ. भानुशाली यांनी सांगितले.
या कार्यक्रमात मुलांनी विविध कलेचे सादरीकरण केले. भारतीय संस्कृतीची प्रचिती या वार्षिक स्नेसंमेलनात आली. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. चं.ग. विधाते, सचिव श्री. पं.द.निक्ते, सहसचिव म.प्र.पाटील आणि खजिनदार श्री प पू म्हात्रे उपस्थित होते. त्याचबरोबर सौ. रेमा गावित, मुख्याध्यापिका मराठी माध्यमिक विभाग, ज्योति सावंत, मुख्याध्यापिका इंग्रजी माध्यमिक विभाग, पूजा आरोलकर, मुख्याध्यापिका मराठी प्राथमिक विभाग आणि मुथ्थुराणी मादियाळ गण, मुख्याध्यापिका इंग्रजी प्राथमिक विभाग यावेळी उपस्थित होते.