आता बेकायदा बांधकामांकडे आयुक्तांचा वळला मोर्चा

पुढील आठवड्यापासून होणार भूमाफियांची पळापळ

ठाणे : ठाण्यात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले असून कळवा, मुंब्रा आणि दिव्यात हा प्रश्न गंभीर झाला आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी आज आढावा घेत सहाय्यक आयुक्तांची झाडाझडती घेतली. अपघात घडून जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे तर पुढील आठवड्यापासून बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत फक्त तक्रारींच्या आधारावर किंवा अधूनमधून कार्यवाही न करता ती दररोज होणे अपेक्षित आहे, जेणेकरुन परिणामकारक पध्दतीने अनधिकृत बांधकामांवर अंकुश मिळवणे सोपे होईल. सध्या अनधिकृत बांधकामांबाबत अधिकाऱ्यांकडून दैनंदिन कार्यवाही होताना दिसत नाही. अंदाधुंद पध्दतीने शहरात सध्या अनधिकृत बांधकामे फोफावताना दिसत आहेत अशा तिखट शब्दात सर्व सहाय्यक आयुक्तांची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आढावा बैठकीत झाडाझडती घेतली. शहरात एखादी दुर्घटना घडून जीवितहानी झाली तर व्यक्तीश: जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

2 मार्च 2009 शासननिर्णयानुसार विविध स्तरावर अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करुन दिल्या असून उपआयुक्तांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण नियंत्रण निमुर्लन पथक कार्यरत राहिल. प्रत्येक प्रभागात होणाऱ्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची व्यक्तीश: जबाबदारी ही सहायक आयुक्त व प्रभाग अधिकारी यांची असेल. प्रभागाची बीटनिहाय विभागणी करुन प्रत्येक बीटमध्ये बीटनिरीक्षक व बीटमुकादम नेमण्यात यावे. बीटनिरिक्षकाने परवानगी नसेल अशी प्रकरणे संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांच्या किंवा सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनास आणावीत. प्रभाग अधिकाऱ्याने याबाबत तपासणी करुन जर ते समाधानकारक आढळले नाही तर नियमानुसार संबंधितांना नोटीस द्यावी, व संबंधित व्यक्ती नोटीस कालावधीत कागदपत्रे सादर न करु शकल्यास त्या गुन्ह्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.

प्रभागस्तरावर बीटनिहाय नोंदवही ठेवण्यात यावी. या नोंदवहीमध्ये त्यांच्या बीटमधील अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण इ नागरी गुन्ह्याशी संबंधित घटनेची नोंद ठेवावी तसेच न केल्यास संबंधित बीट निरीक्षकास जबाबदार धरण्यात यावे. तसेच बीटमध्ये अतिक्रमण अनधिकृत बांधकामाची एकही घटना निदर्शनास न आल्यास त्यांचीही नोंद बीट रजिस्टरमध्ये करण्याची जबाबदारी बीट निरीक्षक व बीट मुकादमाची राहील.

अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाईचा दैनंदिन अहवाल मुख्यालयाकडे उपायुक्तांकडे सादर करावी. उपायुक्तांनी शहरात करण्यात आलेल्या कारवाईचा दैनंदिन आढावा आयुक्तांकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. अनधिकृत बांधकामाबाबत विहित मुदतीत नोटीस न दिल्यास पुढील कारवाई न केल्यास संबंधितांना व्यक्तीश: जबाबदार धरले जाईल अशाही सूचना यावेळी आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

अतिरिक्त पोलीस कर्मचारी घ्या.

अनधिकृत बांधकामाच्या कारवाईकरिता 78 पोलीस कर्मचाऱ्यांची मान्यता शासनाकडून आली आहे. त्यापैकी पोलीस विभागाकडून 48 कर्मचारी देण्यात आले आहेत, परंतु अतिरिक्त 30 पोलीस कर्मचारी घ्या असेही श्री. बांगर यांनी नमूद केले. ठाणे स्टेशनच्या बाहेर अतिक्रमणची कारवाई करताना पोलीसांच्या ड्यूट्या निश्चित केल्या जातील.

निष्कासन शुल्क वाढणार

सद्यस्थितीत अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्यासाठी 50 रु. प्रति चौ. फूटनुसार शुल्क आकारले जाते. सदरचे शुल्क सन 2007 च्या ठरावानुसार निश्चित करण्यात आले होते. सदरचा ठराव हा जुना असून सद्यस्थितीतील आढावा घेऊन शुल्काची रक्कम वाढविण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.