एमएमआरडीएच्या कामांचा यावर्षीचा संकल्प
ठाणे : ‘मुख्यमंत्र्यांचे ठाणे’ असा उल्लेख होत असलेल्या ठाण्यातील आनंदनगर ते साकेतपर्यंतचा उन्नत मार्ग, बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग, आत्माराम पाटील चौक (खारेगाव टोलनाका ते कळवा नाका) रस्त्याचे बांधकाम, तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ ठाणे-बेलापूर रस्ता ते एपीएमसी मार्केटपर्यंत रेल्वे ओलांडणी पुलाचे (आरओबी) बांधकाम आदी कामांचा यावर्षीचा संकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सोडला आहे.
‘एमएमआरडीए’ने गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात ठाणे-मुंबई-ठाणे या पूर्वद्रुतगती महामार्गावर असलेल्या कोपरी पुलाच्या विस्तारीकरणाच्या कामांना प्राधान्य देत या पुलाची सर्व कामे हातावेगळी करण्याचे निश्चित केले होते. मात्र या कामांमध्ये लहान-मोठ्या अडचणी उद्वभल्यामुळे हा प्रकल्प जानेवारी २०२३ च्या जुनमध्ये पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या वर्षात अपूर्ण राहिलेल्या मोजक्याच कामांसह पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंदनगर ते साकेतपर्यंतच्या ६.३० कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचे (एलिव्हेटेड) बांधकाम करणे, ठाणे खाडी किनारा मार्गार्ची उभारणी (कोस्टल रोड), छेडानगर ते घाटकोपर ते ठाणेपर्यंत पूर्व मुक्तमार्गाचे विस्तारीकरण आणि बांधकाम करणे, आत्माराम पाटील चौक (खारेगाव टोलनाका ते कळवा नाका) रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असल्यामुळे महानगरात कामांचा ‘धुरळा’ उडणार आहेच.
प्राधिकरणाने ठाण्यासह नवी मुंबईवर खास लक्ष दिले असून, तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ ठाणे बेलापूर रस्ता ते एपीएमसी मार्केटपर्यंत रेल्वे ओलांडणी पुलाचे (आरओबी) बांधकाम, ऐरोली कटाई नाका रस्त्याची आणि बोगद्याच्या बांधकामांची पूर्तता करणे आदी कामे करण्याचे निश्चित केले आहे.
पारसिक बोगद्याचे ६६% काम पूर्ण
ऐरोली कटाई नाका बोगद्यासह उन्नत मार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर असून प्रकल्पातील उन्नत मार्गाचे (एलिव्हेटेड रोड) काम ८८% पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण १११ पिअर्सपैकी १११ पूर्ण झाले आणि १११ पियर कॅपपैकी १०१ पूर्ण झाले आहेत. तसेच डेक स्लॅब १०५ स्पॅनपैकी ८३ स्पॅनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पारसिक बोगद्याचे ६६% काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातंर्गत दोन बोगदयांची प्रत्येकी लांबी १.६९ कि.मी. आहे.
ठाणे रेल्वे मार्गावरील पुलाचा भाग एमएमआरडीएच्या निधीतून रेल्वेने बांधला आहे. तर प्राधिकरण दोन्ही बाजूंना सिमेंट काँक्रीटमध्ये अप्रोच बांधत असून, काँक्रिटीकरणाचा शेवटचा भाग पूर्ण केला आहे. रस्ता दुभाजक, विद्युतीकरण, रस्ता चिन्हांकित करणे, चिन्हे इ. विविध कामे प्रगतीपथावर आहेत. रेल्वेचे काम पूर्ण होताच ते वाहतुकीसाठी खुले केले जाईल.
सूर्या प्रादेशिक पाणीपुरठा योजना
सूर्या प्रादेशिक पाणीपुरठा योजना प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून वसई-विरार शहर महानगरपालिकेला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामांची प्रगती साधारणत: ९२ टक्के पूर्ण झाली असून, दुस-या टप्प्यातील साधारणत: ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
२०२३ हे वर्ष एमएमआरडीएच्या प्रकल्पांच्या दृष्टीने प्रकल्पूर्तीचे
राज्य शासनाच्या मदतीने एमएमआरडीएची संपूर्ण टीम, मुंबई महानगराच्या सर्वांगीण विकासाकरिता अहोरात्र मेहनत घेत आहे. २०२३ हे वर्ष एमएमआरडीएच्या प्रकल्पांच्या दृष्टीने प्रकल्पपूर्तीचे असल्यामुळे महत्त्वाचे असणार आहे. हे प्रकल्प पूर्ण होताच, ‘एमएमआरडीए’तील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पांचा एकत्रित फायदा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक होईल असा विश्वास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केला.
मेट्रो प्रकल्पांची सद्यस्थिती
मेट्रो २ ब – २९% स्थापत्य कामे पूर्ण, मेट्रो ४ – ४१.४३% स्थापत्य कामे पूर्ण, मेट्रो ४ अ- ४५% स्थापत्य कामे पूर्ण, मेट्रो ५ टप्पा १ – ७२% स्थापत्य कामे पूर्ण, मेट्रो ६- ६३ % स्थापत्य कामे पूर्ण, मेट्रो ९ – ४७% स्थापत्य कामे पूर्ण, मेट्रो १०- साधारण सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि मेट्रो ११- साधारण सल्लागारांची नियुक्ती करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.