विलंबित देयकांमुळे ८०० कुटुंबे मालमत्ता करमाफीपासून वंचित

प्रवीण नागरे यांच्या पुढाकाराने सॉलिटेअरचा ३३ लाखांचा कर माफ

ठाणे : येथील हिरानंदानी इस्टेटमधील ८०० सदनिका असलेल्या सॉलिटेअर या गृहसंकुलातील रहिवाशांना रोमा बिल्डर्सने सन २०२२-२३ या वर्षाकरीता ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करातील सर्वसाधारण करासाठी मिळणा-या ३२ टक्क्यांची सवलत लागू करण्यात आलेली नाही, अशी धक्कादायक माहिती सॉलिटेअर संकुलातील सदस्यांनी दिली.

सन २०१९ पासून पुढील चार वर्षांसाठी एकत्र मालमत्ता कराचे परिपत्रक महापालिकेने विकासकाला व विकासकाने रहिवाशांना दिले. मात्र ‘सॉलिटेअर’च्या रहिवाशांना या वर्षीच्या ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कराचा फायदाच मिळाला नसल्यामुळे त्यांनी विकासक व महापालिकेकडे दाद मागितली. परंतु दोन्ही ठिकाणांकडून रहिवाशांना नकारात्मक उत्तर मिळाले.
अखेर रहिवाशांनी स्थानिक समाजसेवक प्रवीण नागरे यांच्याकडे आपली समस्या मांडली. या समस्येचा सखोल अभ्यास करून प्रवीण नागरे हे रहिवाशांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन गेले.

मुख्यमंत्र्यांनी त्वरित समस्यांचे समाधान काढण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले. त्या अनुषंगाने नागरे यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. महापालिका तीन-चार वर्षांच्या एकत्रित मालमत्ता कराची मागणी विकासकाकडे करत असून एकत्र कर लावल्याने महापालिका या विकासकांना व्याज आकारत नाही. 500 चौरस फुटाची जी योजना आणली आहे, त्यात या कुटुंबांना सामावूनही घेत नसल्याचा महत्वाचा मुद्दा नागरे यांनी आयुक्तांसामोर उपस्थित केला.

शहर विकास विभागाकडून ओसी दिल्या हे लक्षात येताच पालिका आयुक्तांनी त्वरित मालमत्ता कर देयके तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. जेणेकरून रहिवाशांना चार वर्षांचा मालमत्ता कर एकत्र भरण्याची वेळ येणार नाही आणि त्याचबरोबर महापालिकेला मालमत्ता कर दरवर्षी बजेटप्रमाणे मिळेल आणि महापालिका त्याचा शहराच्या विकासासाठी योग्य वापर करू शकेल.

यापुढे ठाणे महापालिकेत ओसी मिळाल्यावर विकासकाला मालमत्ता कर देयके दिली जातील. कोणीही ५०० चौरस फुटांच्या योजनेपासून वंचित राहिले असेल तर त्यांना त्याचा फायदा करून देण्यात येईल, असे श्री.नागरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आणि श्री. नागरे यांच्या पुढाकाराने सॉलिटेअर बिल्डिंगचा ३३.६० लाख रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स कमी करण्यात रहिवाशांना यश आले. रहिवाशांनी प्रवीण नागरे यांचे आभार मानले आहेत.