टोलेजंग इमारती, प्रशस्त रस्ते, खेळाची मैदाने, आरोग्य केंद्रे…
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टर योजना सुरू केली असून या योजनेचे ४४ यूआरपी तयार केले आहेत. ठाणे शहरात सहा ठिकाणी क्लस्टर सर्वेक्षणाला सुरुवात केली असून दिवा शहरातही देखील मंगळवारपासून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिली.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे दिवा शहरप्रमुख माजी उपमहापौर रमाकांत मढवी, क्लस्टर योजनेचे सर्वेक्षण विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील आणि सहाय्यक आयुक्त अक्षय गडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिवा विभागात क्लस्टर सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात रहिवाशांच्या घरांना व व्यावसायिक गाळ्यांना क्रमांक टाकण्यात येतील व त्यानंतर नागरिकांकडून कागदपत्रे मागवली जातील, असे सर्वेक्षण करणाऱ्या प्रमुखांनी सांगितले. दिवा शहरातील नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या पथकाला सहकार्य करावे, अशी विनंती सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक अमर पाटील, आदेश भगत, विभागप्रमुख उमेश भगत, निलेश पाटील, भालचंद्र भगत, गुरुनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मागील वर्षी मार्च महिन्यात सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली होती. याकामी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. क्लस्टर योजनेतून दिव्यात टोलेजंग इमारती, उद्याने, आरोग्य केंद्रे आदी नागरी सुविधा मिळणार आहेत. दिवेकरांना हक्काची अधिकृत घरे मिळणार असून त्यांचे जीवनमान वाढणार आहे.