मुंब्रा-दिव्यात विकासात आघाडी; मालमत्ता करवसुलीत मात्र पिछाडी

तीन महिन्यांत दीडशे कोटींच्या वसुलीचे ठामपाला आव्हान

ठाणे : ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला तीन महिन्यात तब्बल दीडशे कोटींची घरपट्टी वसुली करण्याचे आव्हान असून माजीवडे-मानपाडा प्रभाग समितीने ९० टक्के वसुली केली आहे तर सर्वात कमी वसुली मुंब्रा आणि दिवा या दोन प्रभाग समितीने केली आहे.

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला ७०० कोटी घरपट्टीची वसुली करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३१ डिसेंबरपर्यंत या विभागाने ५५० कोटींची वसुली केली आहे. माजीवडे-मानपाडा प्रभाग समितीला २१५.३९ कोटीच्या वसुलीचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी १९१ कोटी इतकी वसुली म्हणजे ९० टक्के वसुली या समितीने केली आहे.

सर्वात कमी वसुली मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रभाग समितीला अनुक्रमे ६८.२ कोटी आणि ७२.२ कोटी इतके उद्दिष्ट दिले होते, परंतु या विभागाने अनुक्रमे २१ कोटी ७४ लाख, आणि २२ कोटी ६९ लाख इतकी वसुली केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे सुरू आहेत. मात्र मालमत्ता कर भरण्यात हे प्रभाग नेहमीच मागे असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उथळसर प्रभाग समितीला ५७.२१ कोटींचे लक्ष्य दिले होते. त्यापैकी ३६.६३ कोटी इतकी वसुली करण्यात आली आहे. नौपाडा प्रभाग समितीला १०३ कोटी ५४ लाख इतके उद्दिष्ट दिले असताना त्यांनी ६७.१२ इतकी वसुली करण्यात आली आहे. कळवा प्रभाग समितीला ३४ कोटी ८६ लाख इतके उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी १८ कोटी ४६ लाख इतकी वसुली करण्यात आली आहे. ३० कोटी ७८ लाखांच्या उद्दिष्टापैकी १८ कोटी चार लाख इतकी वसुली वागळे प्रभाग समितीने केली आहे.

लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीला ३५.४३ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी २१ कोटी इतकी वसुली करण्यात आली आहे. ११० कोटी ६७ लाख एवढे लक्ष्य वर्तकनगर प्रभाग समितीला दिले होते. त्यापैकी ८० कोटी दोन लाख इतकी वसुली केली आहे तर मुख्यालय येथील मालमत्ता कर विभागाने ७० कोटी लक्ष्यापैकी ६८ कोटी २१ लाख एवढी वसुली केली आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत मालमत्ता कर आहे. पुढील तीन महिन्यांत हा विभाग महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेले उद्दिष्ट पूर्ण करेल, असा विश्वास कर निर्धारक आणि संकलक गजानन गोदापुरे यांनी व्यक्त केला आहे.