छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाचा दावा
ठाणे : विविध मागण्यांसाठी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका रुग्णांना बसलेला नसून ११ शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या पार पडल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
निवासी डॉक्टरांच्या मागण्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत आंदोलने, लेखी निवेदन, निदर्शने करूनही मागण्या सुटत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उगारले आहे. सोमवारपासून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १२० निवासी डॉक्टरांपैकी सर्वच डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे संपाच्या काळात रुग्णांचे हाल होवू नये, यासाठी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह कोविड काळात नेमणूक करण्यात आलेल्या डॉक्टरांपैकी ४० डॉक्टरांची तुकडी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेमण्यात आली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. या संपाच्या काळात ११ शस्त्रक्रिया पार पडल्या असून यामध्ये पाच मोठ्या शस्त्रक्रिया तर सहा लघु शस्त्रक्रियांचा समावेश असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाची दखल घेत, पालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनिष जोशी तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आदींची तातडीची बैठक पार पडली. यावेळी निवासी डॉक्टरांनी संपातून माघार न घेतल्यास रुग्णांची गैरसोय होऊ नये, रुग्णांची काळजी घेतल्यास मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालिका आयुक्त बांगर यांनी सांगितल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील निवासी डॉक्टरांची चर्चा करून संप मागे घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केल्याचे कळते.