मनुष्यबळाअभावी अग्निशमन केंद्राची नवी इमारत धूळ खात

बदलापूर: वाढती लोकसंख्या व शहराचा होत असलेला विस्तार लक्षात घेऊन कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने सन २०११ मध्ये बदलापूर पश्चिम भागातील मांजर्ली येथे लाखो रुपये खर्च करून अग्निशमन केंद्राची दुसरी इमारत उभारली. वर्षभरापूर्वीच सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरणही करण्यात आले आहे. मात्र अद्यापही पुरेशा मनुष्यबळाअभावी हे केंद्र कार्यान्वित होऊ शकलेले नाही.

पूर्वी कुळगाव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रांत एमआयडीसी येथे एकच अग्निशमन केंद्र होते. परंतु शहराचा वाढता विस्तार व झपाट्याने वाढणारी लोकसंख्या याचा विचार करून नगर परिषद प्रशासनाने बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली भागातही आणखी एका अग्निशमन केंद्राची उभारणी केली. मात्र पुरेशा मनुष्यबळाअभावी हे अग्निशमन केंद्र सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष धूळ खात उभे राहिलेल्या या अग्निशमन केंद्राची दयनीय अवस्था झाली.

अलीकडेच सुमारे वर्षभरापूर्वी या अग्निशमन केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले. त्यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामुळे लवकरच बदलापूर पश्चिम भागात असलेले अग्निशमन केंद्र कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आताही पुरेशा मनुष्यबळाचा प्रश्न व सोयीसुविधांचा अभाव असल्याने नुतन अग्निशमन केंद्रही गेल्या अनेक महिन्यांपासून धूळ खात उभे आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पुन्हा एकदा या अग्निशमन केंद्राची दुरवस्था होऊन नूतनीकरणासाठी केलेला खर्च पाण्यात जाण्याची भीती शहरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.

अग्निशमन केंद्र व कर्मचारी यांच्या निकषानुसार एका अग्निशमन केंद्रासाठी २१ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. म्हणजे बदलापुरातील दोन अग्निशमन केंद्रांसाठी ४२ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र अग्निशमन केंद्रात १ अग्निशमन अधिकारी, १ लिडिंग फायरमन, ४ फायरमन, ३ चालक व ११ सफाई कामगार सहाय्य्क म्हणून काम करीत आहेत. म्हणजेच तब्बल ३३ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे स्वाभाविकच या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असल्याचे स्पष्ट आहे. त्याशिवाय अग्निशमन दलाच्या दैनंदिन कामकाजासाठी एक लिपिक व एक शिपाईही आवश्यक आहे.

नवीन इमारतीची रंगरंगोटी आणि डागडुजी झाली असली तरी तिथे अनेक सोयी-सुविधांचा अभाव आहे. अग्निशमन वाहनात पाणी भरण्यासाठी पाण्याचे कनेक्शन, आग वा तत्सम दुर्घटनेबाबत नागरिकांनी माहिती देण्यासाठी टेलिफोन कनेक्शन, त्याचप्रमाणे अग्निशमन कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी टेबल, खुर्च्या, कागदपत्र ठेवण्यासाठी कपाटे, गणवेश व इतर साहित्य ठेवण्यासाठी लॉकरची आवश्यकता आहे. मात्र अद्याप या सुविधाही नसल्याचे अग्निशमन दलातील विश्वसनीय सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

मांजरली अग्निशमन केंद्र सुरू करण्यासाठी अग्निशमन वाहन आणि मनुष्यबळाचा प्रश्न आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या धर्तीवर मानधनावर कर्मचारी नियुक्त करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी अग्निशमन संचालनालयाकडून परवानगी घेण्यात येत आहे.-योगेश गोडसे, मुख्याधिकारी