मध्यरात्री तीन तासांत १६६ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

ठाणे : ३१ डिसेंबरच्या रात्री कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून ठाणे पोलिसानी केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये १६६ गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या. वाहतूक नियम मोडणाऱ्या १७९०जणांच्या विरोधात कारवाई करून सुमारे १२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तर दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या १४०जणांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे.
नववर्षाच्या एक दिवस आधीच २९च्या मध्यरात्री ठाणे पोलीस हद्दीतील ठाणे, भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील ठाणे, भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील २३४ पोलीस अधिकारी आणि १०७० पोलीस ऑल आउट कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. त्यामध्ये बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तडीपार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२जणांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत बार, हॉटेल, ढाबा सुरू ठेवणाऱ्या ५२ बारच्या विरोधात गुन्हे दाखल करून ५२जणांना अटक करण्यात आली आहे. दारूबंदीचा कायदा मोडणाऱ्या ५२जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांची विक्री करण्याचे १९ गुन्हे दाखल करून २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. जुगार खेळणाऱ्या नऊ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी १६४ गुन्हे दाखल करून १६६जणांना अटक करण्यात आली आहे.
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी काल रात्री ११ ते पहाटे १वाजेपर्यंत नाकाबंदी करून पोलिसांनी दारु पिऊन गाडी चालविणाऱ्या १४०जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ३५७ रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करून दोन लाख ६०,८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विना परवाना गाडी चालवणे, विना हेल्मेट गाडी चालवणे, गणवेश परिधान न करता गाडी चालविणे, सिग्नल मोडणे, सीट बेल्ट न लावणे, मोबाईलवर बोलणे आणि इतर अशा १७९०जणांच्या विरोधात कारवाई करून त्यांच्याकडून ११ लाख ६३,५००इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी २,८५१ वाहनांची तपासणी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ३१ तारखेला यापेक्षा जास्त बंदोबस्त ठेवण्यात आला असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.