ठाणे : दोन खून आणि एकाला जीवे ठार मारण्याच्या घटनेने मुंब्रा हादरले असून नववर्षाच्या दोन दिवस अगोदर हे गुन्हे घडल्याने मुंब्रा पोलीस सतर्क झाले आहेत.
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमृतनगर येथे पहिली घटना घडली आहे. येथील फातिमा हाईट्स येथे राहणाऱ्या सब्बा मेहंदी हसमी (३७) यांच्या अल्पवयीन मुंलीचे आणि तिच्या मित्राचा कौटुंबिक वाद झाला होता. त्या वादातून अल्पवयीन १७ वर्षाची मुलगी आणि तिचा मित्र या दोघांनी सब्बा हसमी यांची गळा चिरून छातीवर धारधार शस्त्राने वार करून तिला जीवे ठार मारले. तसेच दोघांनी घराला बाहेरून कुलूप लावून पळून गेले. शेजारी राहणाऱ्यांनी या बाबत पोलिसांना माहिती दिली.
दुसऱ्या घटनेत मुंब्रा रेल्वे स्टेशन रिजवी बाग भागातील आहे. या परिसरात राहणारा इम्तियाज शेख याने आरोपी सुलतान शेख याला रिजवी बाग येथे का आलास असे विचारले असता त्याचा त्याला राग आला. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. इम्तियाज शेख यांचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला असता आरोपींच्या हातातील चाकूमुळे त्याच्या मुलाच्या अंगठ्याच्या जखम झाली. इम्तियाज आरोपींच्या हातातील सुरा घेण्यासाठी गेला असता आरोपी सुलतान याने इम्तियाज याच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार मारले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची आहे. जीवन बाग येथे राहणारे सुलतान शेख हे चालक आहेत. त्यांच्या आईकरिता औषध आणण्यासाठी जात असताना बबली नावाच्या आरोपीने त्यांचे पैशाचे पाकीट काढून घेतले. ते परत देत नव्हते. त्याला धमकावून शिवीगाळ केली, त्यामुळे फिर्यादी सुलतान हा त्याच्या भावाला घेऊन पाकीट परत घेण्यासाठी आला असताना बबली याने त्याच्या पोटावर आणि शरीरावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.