कल्याणातही महारेराच्या बनावट परवानग्यांचे ‘अनधिकृत मजले’

पाच विकासकांवर गुन्हे दाखल

कल्याण : डोंबिवलीतील महारेरा घोटाळा ताजा असतानाच कल्याणातही महारेराची बनावट परवानगी तयार करून बेकायदा मजले उभारणाऱ्या पाच बांधकाम विकासकांवर  खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत, यामुळे बिल्डर लॉबीत खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम  भागातील गौरीपाडा येथे गुन्हा दाखल झालेल्या दोन बांधकाम  व्यवसायिकांनी १२ मजल्यांची इमारतबांधकाम परवानगी असताना त्यांनी १७ मजली अनधिकृत मजले उभारल्याची माहिती ही माहिती अधिकारातून तक्रारदार जहीर अहमद अब्दुल हमिद कुरेशी यांनी उघड केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या संबधित विभागाकडे अनधिकृत मजले निष्कासित करण्यासाठी तक्रार अर्ज  दिला होता. त्यांच्या तक्रारीनुसार मजले उभारणाऱ्यांना नियमाप्रमाणे   बेकायदा मजल्यांबाबत महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली होती. मात्र त्या नोटीसला उत्तर दिले नाही.

गौरीपाडा येथील मिळकतीवर  कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या  नगररचना विभागाने १२ मजल्यांची  इमारत उभारण्यासाठी परवानगी  दिली. मात्र महारेराची बनावट परवानगी तयार करून त्यावर अनधिकृतपणे मजले उभारल्याची लेखी तक्रार जहीर कुरेशी यांनी पालिका आयुक्त आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाला दिली होती. मात्र बेकायदा मजल्यावर कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेऊन बेकायदा उभारलेल्या इमारतीवरील मजल्यांचा प्रकार समोर आणला. यावर न्यायालयात सुनावणी होऊन खडकपाडा पोलीस ठाण्यात संबंधित बांधकाम विकासकांवर गुन्हे  दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २७ डिसेंबर रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यागुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने करीत आहेत.