* अंतर्गत भूमिगत मेट्रोमुळे सुमारे ७५-८० इमारतींचा पुनर्विकास रखडला
* आमदार संजय केळकर यांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा
* मेट्रो प्राधिकरणाची बैठक घेऊन काढणार तोडगा
ठाणे : नियोजित अंतर्गत भूमिगत मेट्रोमुळे जुन्या ठाण्यातील सुमारे ७५-८० जुन्या इमारतींचा पुनर्विकास मंजुरी मिळत नसल्याने रखडला आहे, त्यामुळे हजारो नागरिकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. आमदार संजय केळकर यांनी आज अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा उचलून सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रकरणी लवकरच मेट्रो प्राधिकारणाशी समन्वय साधून तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याने रहिवाशांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
ठाणे शहरातील विविध भागांना जोडणारी रिंग मेट्रो प्रस्तावित असून सिडको बसथांबा ते पूर्व द्रुतगती महामार्गादरम्यान हा मार्ग भूमिगत करण्यात आला आहे. हा मार्ग ज्या परिसरातून जातो, त्या भागात अनेक इमारती या ४० वर्षे जुन्या असून धोकादायक स्थितीत आहेत. येथील हजारो नागरिक जीव मुठीत धरून रहात आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेत प्रस्ताव सादर करण्यात आले असून मंजुरी अभावी रखडलेले आहेत.
या मार्गावरून भूमिगत मेट्रो प्रस्तावित असल्याने पुनर्विकासाचा मंजुरी देत येत नसल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिक भीतीने ग्रस्त आहेत. या रहिवाशांनी आज मंगळवारी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन दिले.
या प्रकरणी सातत्याने आवाज उठवणारे आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा उचलून धरला. ठाण्यातील या भूमिगत मार्गामुळे स्टेशनलगतच्या सुमारे ५० जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी देण्यात येत नाही, त्यामुळे हजारो रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या प्रकरणी तातडीने तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी श्री. केळकर यांनी केली.
तत्पूर्वी श्री.केळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिले आणि या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. यावर लवकरच मेट्रो प्राधिकरणाची बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी दिले.
असा आहे भूमिगत मेट्रो मार्ग
सिडको-कोळीवाडा दत्त मंदिर परिसर-कुंजविहार हॉटेल-पोस्ट ऑफिस-दादा पाटील वाडी-रेल्वे क्वार्टर-बांदल चाळ-उमा नीळकंठ व्यायामशाळा-मनोदत्त-आल्हाद सोसायटी-हिंदू कॉलनी-मानस सोसायटी-चिखलवाडी-महामार्ग ओलांडून प्रादेशिक मनोरुग्णालय