ठाण्यात सार्वजनिक वाहतुकीपेक्षा खासगी वाहनांकडे कल
ठाणे : ठाणे शहरात दरवर्षी ६० हजार वाहनांची भर पडत असून गेल्या दोन महिन्यांत सहा हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी झाली आहे. २३ लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असताना नागरिक खासगी वाहनांना अधिक पसंती दिली असल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून तीन हजारांहून अधिक दुचाकींची आणि 250 ते 300 चारचाकांची नोंदणी जेल मारुतीसमोरील ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे, असे तेथील संबंधित अधिका-यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
सन 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 18 लाख 41 हजार 488 इतकी आहे, परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नोंदीनुसार वाहन संख्या 32 लाखांहून अधिक झाली आहे. त्यामुळेच ठाण्यातील प्रत्येक रस्ता पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत वाहनांनी गजबजलेला दिसतो, अशी टिप्पणी एका आरटीओ अधिका-याने केली. ठाणे शहरात मजबूत अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असताना, ठाणेकर निवासी किमान दुचाकी आणि चार चाकी खासगी वाहने वापरतात.
32े लाख वाहनांमध्ये 1.34 लाख दुचाकींचा समावेश आहे. शहराच्या एकूण वाहनसंख्येमध्ये दरवर्षी 60 हजारांहून अधिक दुचाकींची भर पडते. गेल्या दोन महिन्यांपासून 3 हजारांहून अधिक दुचाकी आणि
जवळपास 3000 चारचाकी वाहनांची भर पडली आहे.
ठाण्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित लोकसंख्या आल्याने दुचाकींची संख्या लक्षणीय आहे. ते मुंबई आणि इतर ठिकाणांशी चांगले जोडले जाण्याकरीता किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाताना सुलभ प्रवासासाठी ठाण्यात राहणे पसंत करतात.
शनिवार आणि रविवार वगळता मुलुंड ते मुंबईतील विविध भागांमध्ये जाणा-या दुचाकीस्वारांची प्रचंड मोठी गर्दी आणि रांगा सोमवार ते शुक्रवारपर्यंत आनंदनगर हायवेवर सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत लागलेल्या असतात. एवढ्या मोठ्या वाहनांच्या संख्येसाठी ठाणे शहरात पुरेसे रस्ते अजिबात नाहीत,अशी खंत वाहतूक पोलीस शाखेच्या एका वरिष्ठ अधिका-याने ‘ठाणेवैभव’शी बोलताना व्यक्त केली.
येत्या 15 जानेवारी 2023 नंतर नव्या ‘मेक’ची वाहने रस्त्यावर येणार आहेत. त्यातील 60 टक्के वाहनांची नोंदणी 1 जानेवारीला होण्याची शक्यता एका अधिका-यासह एजंटांनी व्यक्त केली.