ठाणेः डोंबिवलीपासून थेट टिटवाळा हा कष्टदायक प्रवास अवघ्या सुमारे तीस मिनिटांच्या प्रवासावर आणणारा आणि कल्याण-डोंबिवली शहरावर आमुलाग्र परिणाम करणारा कल्याण रिंगरोड प्रकल्प प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे मोठागाव ते दुर्गाडी पुल या टप्प्याच्या कामासाठी निविदा सुचना प्रसिद्ध झाली असून सुमारे सहा किलोमीटरच्या या प्रस्तावित बाह्यवळण मार्गामुळे हे १० किमी अंतर एक तासावरून अवघ्या सहा मिनिटावर येणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएने बांधकाम कंत्राटदार नेमण्यासाठी ५३१ कोटी ६८ लाखांची निविदा सुचना प्रसिद्ध केली आहे.
डोंबिवली, कल्याणसह आसपासच्या शहरांच्या आणि मुंबई-ठाणे-नाशिक-आग्रा राज्यमार्गांच्या कनेक्टिव्हीटीला बळ देणाऱ्या सुमारे ३० किमी लांबीच्या कल्याण-डोंबिवली-टिटवाळा रिंगरोड प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची भेट घेत कल्याण रिंगरोड प्रकल्पाचा आढावा घेत यातील महत्वपूर्ण अशा मोठागाव ते दुर्गाडी किल्ला या तिसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत एमएमआरडीएच्या माध्यमातून नुकतीच या तिसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा सुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण ५३१ कोटी ६८ लाख रूपये अंदाजित खर्चातून हे काम केले जाणार आहे. या मार्गाच्या उभारणीमुळे मोठागाव ते दुर्गाडी हे अंतर एका तासावरून थेट सुमारे सहा मिनिटांवर येणार आहे.
सध्याच्या घडीला डोंबिवली मोठागाव या भागातून कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी मोठा वळसा घेऊन एक तास लागतो. या परिसरामधील नागरिकांना शिळफाटा किंवा ठाकुर्ली या मार्गाने मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. मात्र कल्याण रिंगरोडच्या या तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पामुळे हा प्रवास विनाअडथळा आणि वेगवान होणार आहे.
असा असेल मार्ग
या सहा किलोमीटरच्या मार्गात सुमारे दोन किलोमीटरचा मार्ग हा खाडीकिनारी स्टील्ट रस्त्याच्या स्वरूपात असणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखून हा मार्ग उभारला जात आहे. चार किलोमीटरचा रस्ता जमिनीलगत असणार आहे. या मार्गामुळे आणि पुर्णत्वास आलेल्या मोठागाव-माणकोली जोडरस्त्यामुळे डोंबिवलीच्या एका टोकाला असलेला मोठा गाव हा परिसर थेट मुख्य स्थानी येणार आहे. या मार्गामुळे डोंबिवलीतील प्रवाशांना कल्याण-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला अवघ्या दहा मिनिटांत जाता येईल.
डोंबिवली शहरासाठी गेम चेंजर प्रकल्प
डोंबिवलीमधील मोठागाव आणि आसपासचा परिसर डोंबिवली शहराच्या एका टोकाला आहे. मात्र माणकोली-मोठागाव जोड रस्ता आणि मोठागाव-दुर्गाडी पुल हा कल्याण रिंगरोड प्रकल्पाचा तिसरा टप्पा डोंबिवलीसाठी गेमचेंजर ठरणार आहे. या भागाला थेट कनेक्टिव्हीटी नाही. हा पूल आणि तिसऱ्या टप्प्यातील मार्गामुळे डोंबिवलीचा हा परिसर प्रमुख भागी येणार आहे. डोंबिवली शहरामधून मुंबई, ठाणे शहर येथे पोहोचण्यासाठी आणि मुंबई-नाशिक-आग्रा महामार्ग अवघ्या दहा मिनिटांच्या प्रवासावर येणार आहे. पर्यायाने शीळफाटा येथील वाहतुक गर्दी कमी होण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा आहे. प्रकल्प अंमलबजावणीसाठी सर्वांनी सकारात्मक मदत करावी, असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.