ठाणे : एरव्ही शहरातील चौक, सिग्नल, खाऊची दुकाने आणि हॉटेलसमोर पैसे मागून पोट भरणारी मुले आणि महिला आता त्या ठिकाणी सांतांच्या लाल टोप्या विकताना दिसू लागल्या आहेत. नाताळची क्रेझ सर्व धर्मियांमध्ये दिसत असल्याने या टोप्यांना मागणीही वाढली आहे. त्यामुळे या टोप्यांच्या विक्रीतून चांगला नफा मिळू लागला आहे.
नाताळ सणानिमित्त ठाण्याची बाजारपेठ सजली असून, सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांसह अन्य धर्मीयांच्या खरेदीला उधाण आल्याचे पहावयास मिळत आहे. प्रत्येक गल्ली, दुकाने ख्रिसमससाठी सजले आहेत. ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, आकाशदिवे, लाल टोपी, छोटे सांताक्लॉज बाजारात विकण्यासाठी आले आहेत. ठाण्यातील बाजारपेठ आणि सिग्नलवर लहान मुले ख्रिसमस टोपी विकताना दिसत आहेत.
एका विक्रेत्याशी संवाद साधला असता तो म्हणाला, आम्ही ख्रिसमस टोप्या दादर येथून आणतो. ठाण्याच्या बाजारात रोज काही न काही विकायला येतो. आधी गजरे विकत होतो आणि आता ख्रिसमस टोप्या विकायला आणल्या आहेत. ख्रिसमस टोपी ६० ते ७० रुपयांपासून १२० रुपयांपर्यंत विकतो. खर्च वगळता रोज ३०० ते ४०० रुपये नफा होतो.
एकूणच नाताळ फिव्हर चांगलाच पसरला असून त्या निमित्ताने रोजच्या विक्रीवर उदरनिर्वाह करणाऱ्या आणि सिग्नलवर पैसे मागून पोट भरणाऱ्या मुला-महिलांच्या चेहेऱ्यावर हास्य उमलले आहे.