कासवे, पोपटांची खुलेआम विक्री; तीन जणांना अटक

ठाणे : ब्लॅक स्पॉटेड कासवे आणि पोपटांची सर्रास विक्री करणा-या तीनजणांना वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक, मानद वन्यजीव संरक्षक आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांच्या टीमने बुधवारी अटक केली. या तिघांना बोरिवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

ब्लॅक स्पॉटेड कासवे आणि पोपटांची सर्रास विक्री करत असल्याची माहिती वनक्षेत्रपाल राकेश भोईर यांना मिळाली होती. त्यानुसार, उपवनसंरक्षक संतोष ससते, सहाय्यक वन संरक्षक गिरिजा देसाई (एलआरपी अँड वाईल्डलाईफ), वनपाल रोशन शिंदे, महेंद्र खेडेकर, रविंद्र तवर, वनरक्षक सुरेंद्र पाटील, वन्यजीव (मुंबई) संतोष  भागणे, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे आदि मल्ल्या आणि मानद वन्यजीव संरक्षक रोहित मोहिते यांनी मंगळवारी संपूर्ण दिवसभर कठोर कारवाई करुन दोनजणांना क्रॉफर्ड मार्केटमधून आणि एकाला ताब्यात घेतले व त्यांच्याकडून पोपट, कासवे हस्तगत केली.

प्रमोद पालला (३१) मालाड पूर्व, शाकीरखान रशीदखान(२५) क्रॉफर्ड मार्केटमधून आणि दीपक म्हात्रेला (२८) मस्जिद बंदर येथून ताब्यात घेतल्यावर त्यांच्यावर २० डिसेंबर रोजी वन्यजीव संरक्षण अधिनियमांतील कलमांनुसार अटकेची कारवाई बुधवारी सकाळी  १० वाजता करण्यात आली आणि त्यांना बोरिवली न्यायालयात हजर केले. एका आरोपीला न्यायालयीन कोठडी आणि अन्य आरोपींना सात दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे.

वन्यजीवन अधिनियमांनुसार पाच  भारतीय पोपट आणि सात ब्लॅक स्पॉटेड कासवे व सात स्टार कासवे यांना हाताळणे व त्यांची वाहतुकही करणे गुन्हा असल्यामुळे आरोपींची कसून चौकशी करण्यात येणार  आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-याने ‘ठाणेवैभव’ला दिली.