अंबरनाथ : अंबरनाथमधील वालधुनी नदी पात्रात रासायनिक पाणी आल्याने पांढऱ्या रंगांच्या फेसाचे उंचच उंच थर जमा झाले होते. नगरपालिका प्रशासनाने श्रमदान आणि लोकसहभागातून राबवलेल्या स्वच्छता मोहिमेला या प्रकारामुळे हरताळ फासला असल्याचे चित्र आज सकाळीच दृष्टीस पडल्याने संतापाची लाट पसरली आहे.
अंबरनाथजवळील डोंगरातून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीला नाल्याचे स्वरूप आले होते, मागील वर्षी नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी लोकसहभागातून तब्बल 100 दिवस नदी स्वच्छता मोहीम राबवली होती, विविध सेवाभावी संस्था, नागरिक, शैक्षणिक संस्था, पालिका आरोग्य खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात प्रभावीपणे नदी स्वच्छ करण्यात आली होती. यानंतर नदी पात्रातून स्वच्छ पाणी वाहू देखील लागले होते.
बुधवार २० डिसेम्बर रोजी रात्री उशिरा नदी पात्रात रासायनिक पाणी सोडण्यात आले आणि पाण्यावर पांढऱ्या रंगाचा फेस सर्वत्र दिसू लागला. पाण्यावर पांढरा फेस दिसताच परिसरातील नागरिकांनी अंबरनाथ नगरपालिकेशी संपर्क साधला. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. पांढऱ्या स्वच्छ रंगाच्या फेसाचे थर नदीपात्रात जमा झाल्याचे सांगितले. नदीकिनारी उग्र वास येऊ लागल्याने त्रास जाणवू लागलयाची तक्रार नागरिकांनी केली.
दुपारनंतर फेसाचे प्रमाण थांबले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली होती. नदीमधील पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी घेऊन गेल्याची माहिती पालिकेचे आरोग्य खात्याचे निरीक्षक महाजन यांनी दिली.