भाजप-शिंदे गटच ठरले ग्रामपंचायतींचे कारभारी

भाजपकडे सर्वाधिक २०३७ ग्रामपंचायती तर राष्ट्रवादीचे १२१९ ठिकाणी वर्चस्व

मुंबई: राज्यात आज 7682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भाजपने एकूण २०३७ ग्रामपंचायतींवर विजयी पताका फडकवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रवादीने १२१९ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.

राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते, आज त्याचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने २०३७, राष्ट्रवादीने १२१९, शिंदे गट ७७२, काँग्रेसने ८६९, ठाकरे गट ६३९ तर इतर पक्षांनी ११३७ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.

राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सरपंचपदी भाजपचे उमेदवार निवडून आल्याचा दावा भाजपने केला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, १८७३ ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले आहेत. तर त्या खालोखाल राष्ट्रवादीचे १००७ ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. शिंदे गटाने ७०९ ठिकाणी तर ठाकरे गटाने ५७१ ठिकाणी आपले सरपंच निवडून आणले आहेत. काँग्रेसने ६५७ ठिकाणी आपले सरपंच निवडून आणले आहेत. इतर पक्षांनी आणि अपक्षांनी ९६७ ठिकाणी विजय मिळवला आहे.

ग्रामपंचायती निवडणुकीत एकत्रित विचार करता भाजप आणि शिंदे गट हा महाविकास आघाडीला भारी पडल्याचं चित्र आहे. भाजप आणि शिंदे गटाने एकत्रितपणे २८०९ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीने २७२७ ठिकाणी विजय मिळवला. तसेच इतर आघाड्यांनी ११३७ ठिकाणी सत्ता मिळवली आहे. राज्यातील ६१६ ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतींचं एकूण बलाबल
भाजप २०३७
शिंदे गट ७७२
ठाकरे गट ६३९
राष्ट्रवादी १२१९
काँग्रेस ८६९
इतर ११३७

भाजपकडे सर्वाधिक सरपंच
भाजप १८७३
शिंदे गट ७०९
ठाकरे गट ५७१
राष्ट्रवादी १००७
काँग्रेस ६५७
इतर ९६७

ठाणे जिल्ह्यात भाजपचा झेंडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळवले आहे. ठाणे जिल्ह्यातील थेट सरपंच पदासाठी 34 ग्रामपंचायतीमध्ये 114 उमेदवारांसह 219 सदस्यांच्या जागांसाठी 613 उमेदवारांच्या अंतिम निकालात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे 42 पैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर दोन ठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्याने रिक्त आहेत.

आज अंतिम निकालात सर्वाधिक 20 ठिकाणी भाजपाचे पॅनल निवडून आले. तर शिंदे गटाचे 13 पॅनल तसेच ठाकरे गटाचे पाच तर दोन ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

भिवंडी: १४ ग्रामपंचायत
भाजप-१८, शिंदे गट-४, ठाकरे गट-१, अपक्ष-१
मुरबाड: १४ ग्रामपंचायत
भाजप-९, शिंदे गट-५, अपक्ष-१

कल्याण: ९ ग्रामपंचायत
भाजप-२, शिंदे गट-३, ठाकरे गट-३, अपक्ष-१

शहापूर: ५ ग्रामपंचायत
भाजप-१, शिंदे गट-१, ठाकरे गट-१

ठाणे जिल्हा एकूण ४२ ग्रामपंचायती
भाजप-२०, शिंदे गट-१३, ठाकरे गट-५, अपक्ष-२