हुमायून धबधबा आणि चेना नदीवर बंधारा बांधण्यास मंजुरी

पाणी टंचाईमुक्त होणार येऊरचे आदिवासी पाडे

ठाणे: येऊर येथील हुमायून धबधबा आणि चेना नदीवर बंधारे बांधण्यास वनविभागाने मंजुरी दिली असून येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या बंधाऱ्यांतून ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिकेला सात दशलक्ष लिटर पाणी मिळणार असून आदिवासी पाडे पाणी टंचाईमुक्त होण्याची शक्यता आहे.

आदिवासी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये ठाणे व मीरा-भाईंदर या दोन्ही महानगरपालिका येत असून काही भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येतो. ठाणे येथील येऊर व मीरा-भाईंदर येथील चेना गावात आदिवासी नागरिक राहत असून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी आणि कूपनलिकेवर अवलंबून रहावे लागत असल्यामुळे त्यांना आजही शुध्द पाणी मिळत नाही. ठाणे व मीरा-भाइर्दर या दोन्ही महापालिकांना स्वत:च्या पाण्याचा स्वतंत्र स्त्रोत नसल्याने पाण्यासाठी स्टेम प्राधिकरण, एम.आय.डी.सी., मुंबई महानगरपालिका यांच्यावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

या परिस्थितीचा विचार करता ठाणे महानगरपालिका हद्दीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये येऊर परिसरातील असलेला हुमायून धबधबा व अन्य दोन धबधबे तसेच मीरा-भाइर्दरमधील चेना नदीवर जलसंधारण विभागाकडून बंधारा बांधून जमा झालेले पाणी दोन्ही महानगरपालिकांना दिल्यास आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. यासाठी ’पाणी अडवा-पाणी जिरवा“ या संकल्पनेनुसार स्थानिक आमदार या नात्याने आमदार प्रताप सरनाईक शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत होते.

हे बंधारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येत असल्यामुळे जलसंधारण विभागाला वन विभागाकडून परवानगी मिळणे आवश्यक होते. त्यासाठी जलसंधारण विभागाकडून बंधाऱ्यांचे सर्वेक्षण करून वनविभागाकडे मंजूरीकरिता अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालानुसार वनखाते विभागाने जलसंधारण विभागाला बंधारे बाधण्यासाठी परवानगी दिली असून जलसंधारण विभागाकडून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून दोन महिन्यात बंधारे बांधण्याच्या कामाला सुरूवात होईल, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

बंधाऱ्यांच्या निर्मितीनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्य प्राण्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधासाठी नागरी वस्तीमध्ये येण्याची गरज भासणार नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे पाण्याच्या शोधासाठी रस्त्यावर आल्यामुळे भरधाव वाहनांच्या धडकेमुळे मृत्यु पावलेले आहेत. पावसाळ्यामध्ये चेना नदीतील पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे व भातशेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.

येऊर व चेना नदीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे स्वच्छ पाणी खाडीमध्ये जात असल्याने या बंधाऱ्यांच्या निर्मितीनंतर ठाणे महानगरपालिकेला किमान चार एम.एल.डी. पाणी आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेला किमान तीन एम.एल.डी. पाणी मिळणार आहे.