आयुर्वेदाचे महत्व पटले, वाढता पाठिंबा मिळेल

मिलिंद बल्लाळ यांना विश्वास

ठाणे : ‘कोरोना काळातील आयुर्वेदिक उपचारांची खात्री पटल्यामुळे यापुढे समाज या काहीशा दुर्लक्षित शास्त्राच्या पाठीशी उभा राहील’, असा विश्वास ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केला.

ठाण्यातील मानपाडा येथे आलेल्या आयुर्वेद रथयात्रेत श्री. बल्लाळ यांनी उपस्थित राहून आयुर्वेदिक उपचाराला समाजाकडून मिळत असलेल्या वाढत्या पाठिंब्याबद्दल भाष्य केले.

पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात `आयुर्वेद रथयात्रा’ काढण्यात येत आहे. मंगळवारी या रथयात्रेचे ठाण्यातील मानपाडा येथील डॉ. उदय कुलकर्णी यांच्या आरोग्यधाम या आयुर्वेद रुग्णालय परिसरात आगमन झाले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी रथयात्रेचे स्वागत करत ठाण्यातील जनजागृती मोहीमेला शुभेच्छा दिल्या.
पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता. जोशी (नाना) यांचे धुळे हे कर्मस्थान. येत्या 5 जानेवारी रोजी त्यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांत `आयुर्वेद रथयात्रा’ काढण्यात येत आहे. 2 डिसेंबर रोजी या `आयुर्वेद रथयात्रा’ला तुळजापूर येथून प्रारंभ झाला. मंगळवारी ठाण्यात आगमन झालेल्या या रथयात्रेचे नियोजन प्रभा आयुर्वेद, आरोग्यधाम, निमा ठाणे, आयुर्वेद संमेलन, आरोग्य भारती, आयुर्वेद व्यासपीठ, लायन्स क्लब या संस्थांच्या वतीने करण्यात आले.

मंगळवारी सकाळी 7.30 वाजता या रथयात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी एका छोटेखानी कार्यक्रमात दीपप्रज्वलन करण्यात येऊन पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता. जोशी (नाना) यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी स्मिताली उमरजकर उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार अधिक जोमाने करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर हा आयुर्वेद रथ ठाणे शहरात फिरण्यासाठी मार्गस्थ झाला.

या रथयात्रेचे स्वागत करण्यासाठी डॉ.एम.पी.शाह, डॉ. आर.पी.शर्मा, डॉ. हरेंद्र दवे, डॉ. दत्तात्रय दगडगावकर, डॉ. श्रीमंत चोथावे, डॉ. सायली कदम आणि रमेश जाधव उपस्थित होते.