वैज्ञानिकांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग

अंबरनाथ: केंद्र शासनाच्या  सूचनेवरून स्वच्छता अभियानात  अंबरनाथला केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोटरी सेंटरमध्ये स्वच्छता पंधरवडा सुरु आहे. या अभियानांतर्गत आज लॅबोटरीमधील मुख्य प्रबंधकांसह वैज्ञानिकांनी स्वच्छता करून स्वच्छतेच्या बाबत जनजागृती केली.
अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील रक्षा मंत्रालयाच्या रक्षा अनुसंधान आणि विकास संघटन (एनएमआरएल – डीआरडीओ), मध्ये १ डिसेंबर ते १५ डिसेम्बर दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केल्याचे एनएमआरएलचे मुख्य प्रबंधक डॉ. प्रशांत रोजतकर यांनी दिली.
यंदा पहिल्यांदाच स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येत आहे, एनएमआरएलमधील वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून मोहीम राबवली जात आहे. कंपनीच्या आवारात स्वच्छता करण्याबरोबरच ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. विविध फळांच्या वृक्षांची लागवड, नगरपालिका कार्यालयाच्या आवारातील महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई, त्याचप्रमाणे निर्मलादेवी दिघे अनाथालयातील विद्यार्थ्यांना लागणारी आवश्यक वस्तू, शुद्ध पाण्यासाठी फिल्टर तसेच खाऊ देण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा अश्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १५ डिसेम्बर रोजी पंधरवड्याचा समारोपप्रसंगी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत आज सोमवार १२ डिसेम्बर रोजी मुख्य प्रबंधक डॉ. रोजतकर यांच्यासह डॉ. दि. बासू , डॉ. इ. मूझेस, डॉ. जी. गुणशेखरन, डॉ. विजय निंबाळकर, विठ्ठल पवार , भरत टपाल यांच्यासह अधिकारी  आणि कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन सफाई मोहिमेत भाग घेतला. त्याचप्रमाणे चिखलोली परिसरातही जाऊन साफसफाई करण्यात आली.
दरवर्षी वर्षातून एक दिवस स्वच्छता मोहीम राबण्यात येत होती. यावर्षी पंधरवडा साजरा केला जात आहे. याला सर्वांचे सहकार्य लाभले आहे. यापुढेही असाच उपक्रम राबवून स्वच्छतेबाबत जनजागृती करणार. – डॉ. प्रशांत रोजतकर, मुख्य प्रबंधक , एनएमआरएल , अंबरनाथ.