ठाणे : ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर अतिक्रमण विभाग आक्रमक झाला असून गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी कळवा आणि दिवा प्रभागात अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात आली.
दिवा प्रभागातील खान कंपाऊंड दोस्ती प्लॅनेट समोर डावले येथील अनधिकृत बांधकाम असलेल्या सात मजली सहा मजलेपर्यंत व्याप्त इमारतीच्या सातव्या मजल्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त श्री गोदेपुरे, सहायक आयुक्त तथा समन्वय व सनियंत्रण अधिकारी महेश आहेर, दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त फारुख शेख यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली.
कळवा येथील कुंभारआळी येथील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर, गावदेवी मंदिराजवळ कळवा, टकले वाडी तसेच जामा मशिदीजवळ इमारतीवर आज कारवाई करण्यात आली.
आजची कारवाई पोलीस बंदोबस्तात झाली. यात 20 कामगार सहभागी झाले होते. कोणत्याही दबावाला न जुमानता अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई यापुढे अशीच सुरू राहणार असून एमआरटीपीचे गुन्हेही दाखल करण्यात येतील, अशी माहिती उपायुक्त महेश आहेर यांनी दिली.