भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कशेळीच्या टोलनाक्याजवळ काल बुधवारी रात्री अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचा ठाणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना व्यावसायिक वादातून घडल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आल्याचे समजते.
गणेश कोकाटे (३३) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तो ठाणे येथील लोढा बिल्डर्सला कामगार पुरविण्याचे काम करीत होता. त्याच ठिकाणी मनुष्यबळ पुरविण्याचे काम करणाऱ्या गणेश इंदुलकरबरोबर त्याचे वाद विकोपाला गेले होते. या पूर्वी गणेश कोकाटे याच्यावर गणेश इंदुलकर याने गोळीबार केला होता. त्यामध्ये चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यामध्ये चार जण अटक होते आणि गणेश इंदुलकर हा फरार होता.
काल (०७ डिसेंबर) बुधवारी सायंकाळी गणेश कोकाटे ठाणे येथून काल्हेर येथील घरी येत असताना त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या आरोपीने गोळीबार करून ते फरार झाले. या घटनेनंतर गंभीर जखमी गणेश यास ठाणे ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. व्यावसायिक वादातून ही हत्या झाली असून पोलिसांची तीन पथके फरार आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे,पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, सुनील वडके यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा भिवंडी ठाणे अशी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान गणेश कोकाटे याने सप्टेंबरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नारपोली पोलिसांकडे आरोपी गणेश इंदुलकर याच्याकडून जीवाला धोका असल्याबाबत तक्रार दिली होती. त्यामध्येही नारपोली पोलीस फरार आरोपी गणेश इंदुलकर याचा शोध घेत होते.