माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा पालिका प्रशासनाला प्रश्न
ठाणे: क्लस्टरच्या नावाखाली जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीची परवानगी अडवणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत.
कळव्यात अनेक जुन्या इमारती अशा आहेत कि ज्या कधीही कोसळू शकतात. अशा इमारतींचे प्रस्तावही प्रशासनाने अडवून ठेवले आहेत. या जुन्या इमारती कोसळून दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का ? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रशासनाला विचारला आहे.
धोकादायक आणि जीर्ण इमारतींमध्ये राहण्यापेक्षा पुनर्विकास लवकर व्हावा अशी अनेक नागरिकांची इच्छा आहे. मात्र क्लस्टरमध्येच पुनर्विकास केला जाईल या प्रशासनाच्या हट्टामुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास यामुळे रखडला आहे. परिणामी आपला हक्काचा निवारा सोडून भाड्याच्या घरात किंवा चाळीत राहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. अनेक इमारतींच्या खाली दुकानाचे गाळे असून अनेकांचा व्यवसाय या ठिकाणी सुरु आहे. क्लस्टर योजनेमुळे विशेष करून जुन्या ठाण्यातील तसेच कळव्यातील अनेक जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या मंजुऱ्या रखडल्या आहेत.
ठाणे महापालिकेकडे एखाद्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केल्यास आधी क्लस्टर सेलचा अभिप्राय मागवला जात आहे.
दुसरीकडे सदरची योजना एखाद्या युआरपीमध्ये येत असल्यास क्लस्टर योननेतूनच पुनर्विकास करण्याचा पर्याय ठेवला जात आहे. किंवा संबंधित इमारतींच्या पुनर्विकासाठी आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ आहे का? अशी विचारणा केली जात आहे. त्यामुळे इच्छा असूनही पुनर्विकासाला मंजुरी मिळत नसल्याने नागरिकांना धोकादायक इमारतींमध्येच वास्तव्य करावे लागत आहे.
यासंदर्भात आता जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करून या प्रश्नावर प्रशासनाला चांगलेच खडे बोल सुनावले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये क्लस्टरच्या नावाखाली अनेक जुन्या इमारतींचे प्रस्ताव अडवून ठेवले असल्याचे नमूद केले आहे. यातील काही इमारती या अधिकृतही आहेत आणि त्या कधीही कोसळू शकतात. क्लस्टरच्या प्रश्नाने ठाण्याचा विकास थांबू नये आणि इमारती कोसळून कोणाचा तरी मृत्यू होऊ नये अशी सरकारला विनंती असल्याचे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.