ठाणे : ठाणे शहरातील वाढत्या शहरीकरणाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन राखण्यासाठी कमी जागेत जास्त वनस्पतीची लागवड करता येणारे ठाण्यातील पहिले मियावाकी जंगल शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक काम करणाऱ्या ग्रीन यात्रा या संस्थेच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार असून प्राथमिक स्वरुपात तीन हजार चौ. मी. जागेत मियावाकी जंगल उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. कौपरखैरणे येथे निसर्ग उद्यान, ज्वेल ऑफ नवीमुंबई ठिकाणी अशा प्रकारची शहरी जंगले उभारण्यात आली असून निश्चितच त्याचा पर्यावरणाला फायदा होत आहे.
ठाण्यात अशा प्रकारचे जंगल उभारण्यासाठी एकूण आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये निसर्गउद्यान मुल्लाबाग येथे आठ हजार चौ.मी, मोघरपाडा दुभाजक येथे पाच हजार चौ.मी, मोघरपाडा येथील आरक्षित मोकळा भूखंड ए येथे 7300 चौ.मी, प्लॉट बी येथे 1500 चौ.मी, कोपरी येथे 4700 चौ.मी. नागला बंदर येथे एक हजार चौ.मी, तर पारसिक विसर्जन घाटाजवळ तीन हजार चौ.मी अशी एकूण 7.6 एकर जागा निवडण्यात आली आहे.
सीएसआर निधीच्या माध्यमातून मियावाकी जंगल उभारता येणार असून यासाठी महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. तसेच झाडांची लागवड व तीन वर्षे देखभाल दुरूस्तीचा खर्च सदर संस्था करेल. तसेच या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कार्बनक्रेडीटवरही महानगरपालिकेचा अधिकार राहणार असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
सध्या जागेची वानवा असली तरी मियावाकी ही झाडे लावण्याची अशी पद्धत आहे जिथे कमी जागेत जंगल निर्माण होऊ शकते. जिथे 6 चारचाकी गाड्या उभ्या राहतात इतक्या लहान ठिकाणात 300 विविध प्रकारची झाडे लावली जाऊ शकतात. आपल्या शहरात अशी लहान जागेतील जंगले तयार करण्यासाठी ‘ग्रीन यात्रा’ या पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाअंतर्गत विकसित केलेल्या जागेत देखील मियावाकी पध्दतीने झाडे लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामध्ये हिरानंदानी मिडोज, वाघबीळ, सेंट्रलपार्क आदी विभागांचा समावेश करण्यात यावा असे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी उद्यान विभागाला दिले आहे.