या बोम्मईला बसवायलाच हवे!

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची कान उपटण्याची वेळ आली आहे. ते ज्या पक्षातर्फे मुख्यमंत्री म्हणून कारभार हाकीत आहेत त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचा अगोचरपणा कसा सहन करतात याचे आश्चर्य वाटते. विशेषतः ज्या महाराष्ट्राविरुध्द ते गरळ ओकत आहेत त्या राज्यात भाजपा हा सत्तेला प्रमुख घटक असताना त्यांनी राजकीयदृष्ट्या तरी सध्या घेतलेला बेजबाबदार पवित्रा घ्यायला नको होता. यामुळे पक्षाची आणि विशेषत: महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची भलतीच कोंडी झाली आहे. इतका उन्माद आणि उन्मत्तपणा वेळेत थांबवला नाही तर तो अधिक पोसला जाईल आणि परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. भाजपाला त्याचे मोठे नुकसान पोहोचेल कारण सीमावाद हा राजकारणापालिकडचा विषय आहे. तो मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. जर बोम्मई राष्ट्रीय हिताचा विचार करीत नसतील तर महाराष्ट्राने तसा ठे का घेतलेला नाही. महाराष्ट्र ही दादागिरी सहन करणार नाही आणि त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत भाजपाला भोगावे लागतील. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आं बेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिनी दोन राज्यांमध्ये सीमाप्रश्‍नावरुन संघर्षाचा भडका उडावा हा विचित्र योगायोग म्हणायला हवा. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार देशातील कोणत्याही प्रांतात राहणाऱ्या नागरिकाला मुक्तपणे देशभर संचार करण्याची मुभा आहे. असे असताना हे बोम्मई महाशय आपल्या मंत्र्यांना अडवतातच कसे? इतकी मस्ती येते कु ठून? त्यांना चाप लावणारे अशी बघ्याची भूमिका घेतातच कसे? या सर्व प्रकरणात शिवसेना (उध्दव ठाकरे) गट यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांविरुद्ध घेतलेली भाजपाची सावध भूमिका यांमुळे महाराष्ट्रातील जनता संभ्रमात पडली असली तरी अशा विषयांमुळे विरोधी पक्षाला अधिक सहानुभूती मिळू शकते. जेव्हा जनतेचे मन जिंकण्यासाठी जिव्हाळ्याच्या विषयांची वानवा होती तेव्हा बोम्मईनेएखादी भेटवस्तू द्यावी तसा मुद्दा उध्दव ठाकरे यांच्या हातात अलगद ठे वला आहे. त्याचा ते पुरेपूर फायदा घेतील यात वाद नाही. सत्तांतरानंतर इतकी नामी संधी हाती लागल्यावर कोण सोडेल? श्री. शरद पवार यांची पत्रकार परिषदेतील भाषा तितकीच आक्रमक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मुसंडी मारण्याची संधी मिळाली आहे. या विषयाचे सातत्याने राजकारण होत आले आहे. महाराष्ट्राने नेहमीच नमते घेतले आहे. हा संस्काराचा भाग असला तरी बोम्मई आणि त्यांची पिलावळ त्याला दबळेपण ु ा मानू लागली आहे. उभय राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिकऔद्योगिक-सामाजिक देवाणघेवाण सुरु असते. जागतिकीकरणाचे फायदे बेंगळुरुला जसे मिळाले तसे मुंबई-पुणे आदी शहरांना मिळाले. देशांमधील सीमा पुसल्या जात असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र दोन राज्यांमधील सीमा अधिक ठसठशीत करू पहात आहेत. जी-20 राष्ट्रांचे प्रमुखपद आपल्या नेत्याला मिळाले असताना बोम्मई अत्यंत मागासलेपणाचा विचार करीत आहे. या बसवराज बोम्मई यांना बसवण्याची वेळ आली आहे.