ठाण्याहून बंगळुरूला निघालेल्या बस कोल्हापूरातूनच परतल्या

सीमावादाचा हजारो प्रवाशांना फटका

ठाणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचा फटका एसटीलाही बसला आहे. कर्नाटकमध्ये गेलेल्या एक बसवर दगडफेक झाल्यानंतर राज्यातून कर्नाटककडे बस सोडणे तूर्त बंद केले आहे. ठाणे डेपोमधून गेलेल्या दोन बस कोल्हापूरातच थांबवल्याने प्रवाशांचे हाल झाले.

मुख्यमंत्री बोम्मई यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. बेळगाव आणि सोलापूरहून कर्नाटकमध्ये जाणा-या एस.टीच्या सर्व बसेसना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास ठाणे, पुणे, सोलापूरहून गेलेल्या प्रवाशांना सोसावा लागला. बेळगाव, हुबळी, बंगळुरुकडे जाणा-या किमान १५ ते २० बसगाड्यांचा प्रवास कोल्हापूरात खंडीत करण्यात आला आहे. काही प्रवासी थांबले असून, ब-याच प्रवाशांच्या परतीच्या  प्रवासाची व्यवस्था केली आणि अनेक प्रवाशांना ‘रिफंड’ देण्यात आला आहे, अशी माहिती एस.टी.च्या कोल्हापूर आगाराचे व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.

ठाण्यातून गेलेल्या दोन बसेसचा , पुण्याहून दोन आणि तीन बेळगावला जाणा-या बसगाड्यांचा प्रवास कोल्हापूरमध्ये थांबवण्याचा आणि बंगळुरूहून मुंबईला येणा-या एमएसआरटीसी (एस.टी) बसगाड्यांनाही दगडफेकीला सामोरे जावे लागल्याामुळे कोल्हापूर एस.टीच्या स्थानिक वरिष्ठ अधिका-यांनी बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, बारामती, इचलकरंजी, रत्नागिरी, चिपळूण, कोकणहून बेळगाव, हुबळी आणि कर्नाटकात सकाळी जाणा-या बसेस् दुपारी आणि सायंकाळी पोहचल्या. मात्र परिस्थितीचे गांभिर्य पाहून एकाही एसटी बसला पुढे न नेण्याचा निर्णय कोल्हापुरातील एस.टीच्या वरिष्ठ अधिका-यांनी घेतला.

तेथे पोहचलेल्या एसटी बसमधील ब-याच प्रवाशांना याबाबत काहीच माहित नसल्यामुळे प्रवाशांची गर्दी स्थानकातील उद्घोषणा कक्षासमोर वाढत गेली. संबंधित अधिकारी आणि वरिष्ठ अधिका-यांनी प्रवाशांना ही परिस्थिती समजून दिल्यावर त्यांना वास्तव समजले. परंतु गर्दीकल्लोळामुळे सर्वच प्रवाशांच्या चेह-यावर एकच प्रश्न होता, आम्ही कसे परतणार .

एस.टीच्या स्थानिक वरिष्ठ अधिका-यांनी उद्घोषणा करुन, परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली. त्याकरीता बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जेथून प्रवासी निघाले आहेत, त्यांना गंतव्य स्थानी नेण्याची जबाबदारी एस.टी  व्यवस्थापनाची आहे, असे एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

सौंदत्ती यलम्मा यात्रेकरुंसाठी लाखो भाविक तेथे गेले आहेत. त्यांच्या प्रवासासाठी कोल्हापूरहून एस.टी बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. बसगाड्यांची ये-जा सुरु असल्यामुळे एसटीच्या अधिका-यांना आणि कर्मचा-यांना तेथे ड्युटी लावली आहे. यामुळे एस.टी.च्या अधिका-यांची धावपळ उडाली होती.