कल्याण-डोंबिवली मतदार यादीत सावळा गोंधळ
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवक मोहन उगले यांचे नाव पालिकेकडून प्राप्त झालेल्या नवीन मतदार यादीत नसल्याने निवडणूक विभागाच्या मतदार यादीत सावळा गोंधळ समोर आला आहे. विशेष म्हणजे याआधी सध्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह त्यांचे भाऊ, मुलगा यांचे नाव देखील वगळण्यात आले असल्याचा गौप्यस्फोट निवडणूक अधिकारी वर्षा थळकर यांनी केला.
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रभाग क्र. २१ फडके मैदान प्रभागाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांचे पालिकेकडून प्राप्त झालेल्या नवीन यादीतून वगळण्यात आल्याचे निर्दशनास आले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यालय कल्याण पश्चिम प्रांत कार्यालय येथे धाव घेतली. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार वर्षा थळकर यांना जाब विचारला असता दुबार नाव असल्याने ते कमी झाले असावे असे उत्तर दिले.
बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांनी यापूर्वीही विश्वनाथ भोईर यांचे, त्यांच्या भावाचे तसेच मुलाचे नाव वगळण्याबाबत ऑनलाईन अर्ज आला होता असे सांगितले. याबाबत आमदारांना कळविले असता त्यांनी नाव कमी करण्याबाबत कुठल्याही प्रकारचा अर्ज केला नसल्याचे सांगितल्याने त्यांची नावे कमी करण्यात आली नसल्याचे थळकर यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात साडे आठ लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. त्यातच कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत ४ विधानसभा क्षेत्रात सुमारे ३,५०,००० नावे मतदार यादीतुन वगळलेली असून कल्याण १३८ विधानसभा यादी अंतर्गत सुमारे १ लाख २२,२५२ नावे वगळण्याच्या प्रक्रियेत सुमारे ४,००० मतदारांचे फोटो प्राप्त झाल्याने त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये मयत मतदार तसेच फोटो नसणे, स्थालांतरीत मतदार, दुभार नावे असणारे मतदार यांची नावे वगळली असल्याचे निवडणूक नायब तहसीलदार वर्षा थलकर यांनी माहिती दिली. मतदार यादीत आपले नाव आहे का नाही ? हे पाहणे गरजेचे आहे. तसेच नसल्यास योग्य ते फार्म भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे असे आवाहन थळकर यांनी केले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक, मोहन उगले, सुनील वायले, विद्याधर भोईर, अनंता पगार, धर्मेंद्र सिंग, बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेविका छाया वाघमारे, महिला आघाडी शिवसेना कल्याण शहर नेत्रा उगले, माजी नगरसेविका शालिनी वायले, कल्पना जमदाडे, सुरेखा दिघे, यामिनी ढोकिया, एरगुडे आदी उपस्थित होते.
मतदार याद्याच्या सावळा गोंधळाबाबत माजी नगरसेवक मोहन उगले यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, मतदार याद्या कार्यालयात सोमवारीच आमच्या हाती आल्या. त्या चाळत असताना माझे नावच मतदार यादीत नसल्याचे लक्षात आले. दोन वेळा मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. निवडणूक लढण्याआधीच नामोहरम करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर आमदार भोईर, त्यांचा भाऊ आणि मुलगा यांचे नाव देखील ८ नं च्या फॉर्म भरून वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. निवडणूक लढवू नये म्हणून हा प्रकार सुरु आहे, ही शोकांतिका आहे, हा सर्व प्रकार निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला असून नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावे याबाबत निवेदन दिले. आमदार-खासदार आमचे असून देखील हा प्रकार होत आहे याचे दुःख होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण पश्चिमचे 4 लाख 78 हजार मतदार आहेत. कल्याण पूर्व 3 लाख 57 हजार, कल्याण ग्रामीण मध्ये 4 लाख 40 हजार मतदार आणि डोंबिवली 3 लाख 72 हजार, असे चार विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण 16 लाख 49 हजार 270 मतदार आहेत. त्यापैकी कल्याण पश्चिमेत 1 लाख 22 हजार, कल्याण पूर्वेत 92 हजार 192, कल्याण ग्रामीणमध्ये 82 हजार 364 आणि डोंबिवलीत 1 लाख 17 हजार 92 मतदार अशा एकूण 4 लाख 13 हजार मतदारांची यादीत छायाचित्रे नसल्याचे समोर आले होते. त्यापैकी 1 लाख 67 हजार 909 मतदारांची नावे मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर ते राहत नसल्याने वगळण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.