प्रशासनाकडून सीमांकन पूर्ण हरकती-सुचनांनंतर मंजुरी
ठाणे : जुन्या ठाण्यातील इमारतींचा पुनर्विकास करताना अडथळा ठरणाऱ्या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी ठाणे महापालिकेने रस्त्यांचे सीमांकन केले असून भविष्यात शहरातील रस्ते प्रशस्त करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यात आला आहे. ठाणेकरांच्या हरकती-सूचनांनंतर त्याची अंमलबजावणी केली
जाणार आहे.
शहरातील नौपाडा, चरई, मुख्य बाजारपेठ आदी जुन्या ठाण्यातील ३४ अरुंद रस्ते सहा, नऊ, १२, आणि काही रस्ते १८ मीटर रुंद आहेत. त्या रस्त्यांचे अनुक्रमे ९, १२, १८ आणि २४ मीटर इतके रुंदीकरण भविष्यात करावे लागणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या शहर नियोजन विभागाने रस्त्यांचे सीमांकन निश्चित केले आहे. या रस्त्यांचे रुंदीकरण करताना काही इमारती, जुनी घरे, बाधित होण्याची शक्यता आहे. जुन्या ठाण्यातील आणि गावठाण भागातील इमारतींचा पुनर्विकास केला जात आहे. या इमारतींचा पुनर्विकास होत असताना रस्ते मात्र अरुंद असल्याने पार्किंग आणि इतर समस्या निर्माण होत आहेत. पुनर्विकास होत असलेल्या इमारतींचे नकाशे मंजूर करताना अडचणी निर्माण होत आहेत. भविष्यात शहराची लोकसंख्या वाढणार आहे, त्यामुळे प्रशस्त रस्ते आवश्यक असल्याने महापालिका प्रशासनाने त्यांच्या अधिकारात शहरातील रस्त्यांचे सीमांकन केले आहे. त्यावर २५ डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या असून ठाणेकरांच्या सूचना-हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर आणि स्थायी समितीच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
नऊ मीटर रुंदीकरण होणारे रस्ते
आहिल्यादेवी उद्यान, सेंट जॉन हायस्कूल ते सुंदर अनाजी रस्ता, शिवाजी पथ ते राघोबा शंकर पथपर्यंत लोहार आळी, कोपरी पूर्व कन्हैया नगर ते काशी आई चौक, शांताराम आपटे मार्ग (राम मारुती-जैन मंदिरालगत महात्मा फुले मार्गाला जोडणारा रस्ता), स्व. मुकुंद नातू मार्ग, साने गुरूजी पथ-सिता सोसायटी ते उमा निळकंठ व्यायामशाळा, कळवा स्टेशन रोड, माजिवडा गावाकडे जाणारा रस्ता, कृष्णकुंज, महागिरी रोड परिसरातील रस्ता, पहिली राबोडी नाका ते अग्नेलो सरफेस हाऊस ते काझी अपार्टमेंट, दत्त मंदिर ते शेख हजरत मापलेशहाबाबा दर्गा, खान कंपाऊंड येथील के.के. रेसिडेन्सीच्या मागील रस्ता, अग्नेलो सरपेस हाऊस ते अझम्पशन अपार्टमेंट ते टीजेएसबी बॅंक ते के. व्हीला ते अदनान महल रस्ता
रुंदीकरणातील इतर रस्ते
१२ मीटर: भगवती शाळा ते गोखले रोड, पहिली राबोडी नाका डॉ. अन्सारी रोड ते ठाणे महापालिका शाळा, वंदना, वर्षा, न्यु सोनल सोसायटी अंतर्गत रस्ता भक्ती निवास मार्गापासून ते लाल बहादुर शास्त्री मार्ग, तळवळकर व्यायाम शाळा ते अमर ज्योती सोसायटी व्हाया जीवन ज्योती सोसायटी, धानजी पुंजा पटेल मार्ग, कै.एअर मार्शल हेमंत चिटणीस मार्ग
१५ मीटर: साने गुरूजी पथ – गोखले रोड अमृता स्नॅक्स ते टीजेएसबी बॅंक आणि दादा पाटील वाडी सॅटीस पुल ते वामन हरी पेठे ज्वेलर्स
१८ मीटर: आझादनगर मिनाताई ठाकरे चौक ते सेवा रस्त्या पर्यंत, एल.बी.एस रोड कोलबाड रोड ते जागमाता मंदीर मार्ग.
२१ मीटर: प्रभाकर हेगडे मार्ग हॉली क्रॉस शाळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत
२४ मीटर: वर्तकनगर नाका ते सावरकर नगर म्हाडा कॉलनी आणि मीनाताई ठाकरे चौक ते वृंदावन बस स्टॉप