लोकल ट्रेनमध्येच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

कल्याण : टिटवाळा रेल्वे स्थानकात कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्येच एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना शुक्रवारी घडली.

लोकल ट्रेनमध्ये बाळाला जन्म देणाऱ्या मातेचे नाव प्रिती वाकचौरे  नाव असून बाळासह आई सुखरूप असल्याची माहिती टिटवाळा लोहमार्ग पोलिसांनी दिली. ही महिला शहापूर तालुक्यातील आटगाव परिसरात राहणारी आहे. मध्य रेल्वेच्या  आटगाव स्टेशनहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही महिला रूग्णालयात जाण्यासाठी रेल्वे प्रवास करीत असताना टिटवाळा रेल्वे स्थानकात तिला प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यावेळी  महिला डब्यातील महिला प्रवासी यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली.

महिला जीआरपी आणि आरपीएफ रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेतली महिला प्रवासी, महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे टिटवाळा स्थानकात तिला मदत करण्यासाठी लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ  सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून आईसह बाळाला पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.