थकबाकीदारांचे पाणी तोडले; ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले

ठामपाची वर्षभरात ४३१६जणांवर कारवाई

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपट्टी थकविणाऱ्या ४,३१६ ग्राहकांच्या नळजोडण्या या वर्षी खंडित करण्यात आल्या असून अभय योजनेचा लाभ न घेता पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा ठाणे महापालिका प्रशासनाने दिला आहे.

ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षात मीटर पद्धतीने 72,120 तसेच नॉन मीटर पद्धतीने 1,53,295 असे एकूण 2,25,415 इतक्या संयोजनधारकांना पाणी देयके आकारण्यात आली आहेत. यामध्ये रुपये 95.13 कोटी इतकी मागील थकबाकी असून त्यावर रुपये 38.79 कोटी इतका प्रशासकीय आकार (दंड) आकारण्यात आला आहे. पाणी देयके वसुलीपोटी विभागामार्फत आतापर्यत 4316 इतकी नळसंयोजने खंडीत केली असून 97 मोटर / पंप रुम्स सील करण्यात आले आहेत. अशा प्रकारची व यापेक्षा कठोर कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी देयकाचा भरणा त्वरीत करुन महापालिकेस सहकार्य करावे व प्रशासकीय आकार (दंड) माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घरगुती पाणी बिलाची थकीत रक्कम एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांकरिता १०० टक्के दंड आणि प्रशासकीय आकार माफ करण्याची योजना जाहीर केली आहे. १ डिसेंबर ते ३१ मार्च २०२३ दरम्यान चालू बिल आणि थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना ही योजना लागू आहे. या योजनेला यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, त्यामुळे पाणीपट्टीची थकीत रक्कम भरावी अन्यथा थकबाकीदार ग्राहकांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांनी पाणीपट्टी बिलाची देयके ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागसमिती कार्यालयात जमा करावीत. तसेच नॉन मीटर पद्धतीच्या पाणी देयकांसाठी महापालिकेच्या https://watertax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर तसेच मीटर पद्धतीसाठी https://tmcswmb.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.