ठाण्यात गोवरचा दुसरा बळी

ठाणे : मुंब्रा कौसा भागातील दीड वर्षाच्या बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बालकाला लस दिली नसल्याची बाब पुढे आली आहे. या आधी शीळ येथील साडेसहा वर्षाच्या मुलीचा गोवरने मृत्यू झाला आहे.

गोवरने मृत्यू पावलेला बालक ११ महिन्यांपूर्वी आईसोबत उत्तर प्रदेशातून मुंब्रा येथे आला होता. त्याला ताप आल्याने त्याच्या घरच्यांनी खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी नेले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी कौसा आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला २३ नोव्हेंबरला पार्किंग प्लाझा येथे दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती खालावल्याने त्याला २५ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात आले. २७ नोव्हेंबर रोजी त्याची प्रकृती अधिक खालावल्याने मृत्यू झाला.

मागील अनेक दिवसांपासून आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या वेळी कौसा आरोग्य केंद्राच्या हद्दीत एका घरात लहान मुले असल्याची माहिती लपविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा परिचारिका (एएनएम) लसीकरण मोहिमेसाठी गेले असता, त्या घरात दोन बालके असल्याचे आढळून आले. यामध्ये मृत्यू पावलेल्या बालकासह अन्य एक बालक असल्याचे आढळून आले. यामध्ये मृत्यू झालेल्या बालकाने एकही लस घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. दुसऱ्या बालकाने एक लस घेतली असून लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.