विकासकामे झाडांच्या मुळावर
ठाणे : कोणतेही पूर्वनियोजन न करता ठाणे शहरातील वाढती विकासकामे झाडांच्या मुळावर येत आहेत. विविध कामांमुळे सर्रास रस्ते खणले जात असल्याने मूळे मातीपासून सुटून मुसळधार पाऊस अथवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तब्बल तीन हजार झाडांचा ‘मृत्यू’ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षांची महत्वाची भूमिका आहे. ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करत असली तरी या रोपणानंतर झाडांचे काय होते, याचा पत्ता महापालिकेला नसतो, असे वृक्षप्रेमींचे स्पष्ट मत आहे. सन २०१८ ते २०२२ या काळात पडलेल्या एकूण तीन हजार झाडांपैकी सर्वाधिक ७७१ झाडे २०१९ मध्ये पडली होती.
नागरी विकास कामांसाठी रस्ते खणले जातात, पण रस्ते खणताना झाडांचा तोल सर्व मुळांवर अवलंबून असतो . एकाच बाजूने ‘मुळे’ तोडल्यास वृक्ष दुसर्या बाजूला कलंडतो. मुसळधार पावसात ते आणखीन कमकुवत होतात व वादळी वाऱ्यात कोसळतात, असे वन विभागाचे अधिकारी आनंद ठाणगे यांनी सांगितले. झाडे वाढली की त्यांच्या फांद्यांची छाटणी शास्त्रीय पद्धतीने होत नाही. वेडीवाकडी छाटणी झाल्यामुळे झाडाचा भार वाढून ते जमीनदोस्त होतात,असेही ते म्हणाले.
वर्ष झाडे पडली
२०१८ ४८०
२०१९ ७७१
२०२० ५१२
२०२१ ६२८
२०२२। ५००