कौसा-मुंब्र्यात सर्व्हे करायचा कसा ?
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत गोवरचे रुग्ण वाढत असताना या साथीचे सर्वेक्षण करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर रहिवासी धावून जात असल्याचे प्रकार मुंब्रा-कौसा भागात घडत आहेत. लसीकरणाला स्थानिकांकडून विरोध होणार असेल तर सर्वेक्षण करायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठाण्यात मागील काही दिवसांपासून गोवरच्या संख्या वाढत आहे. गोवरला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण मोहीम आणि सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. यामध्ये मुंब्रा, कौसा, आतकोनेश्वरनगर, शीळ आणि वर्तकनगर या आरोग्य केंद्रांवर भर दिला जात आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला २७४ जणांचे नमुने घेण्यात आले असून त्यातील ५४ जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यातील ३६ रुग्ण पार्कीग प्लाझा आणि १४ रुग्णांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये ० ते ५ या वयोगटातील ७० टक्के, ६ ते १५ वयोगट-२९ टक्के आणि १५ ते १८ वयोगटातील एक टक्के रुग्णांचा समावेश आहे. यातील बहुतेकांनी गोवरची लस घेतली नसल्याचेच तपासणीत आढळून आले आहे.
गोवरला रोखण्यासाठी महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र मुंब्य्रात सर्वेक्षण करण्यासाठी जाणाऱ्या पथकाला अतिशय वाईट अनुभव येत असल्याचे दिसून आले आहे. अमृतनगर भागात सर्व्हेसाठी गेलेल्या पथकाला इमारतीमधील सर्व रहिवासी मारहाण करण्यासाठी धावून आल्याचे उघडकीस आले आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या तोंडावर दरवाजा बंद करण्यात आला. एका घटनेत पथकातील एका कर्मचाऱ्याची बोटे दरवाज्यात अडकली. त्यातही घरात असतांना बाहेरुन कुलुप लावून घेऊन घरातच लपून बसण्याचे प्रमाणही या भागात अधिक असल्याचे सर्व्हेत दिसून आले आहे. लसीकरण आज नको उद्या या असे सांगून दुसऱ्या दिवशी घराला टाळे लावून बाहेर निघून जाणे असेही काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे सर्व्हे आणि लसीकरण करायचे कसे असा पेच महापालिकेच्या पथकांना पडला आहे.
शाळा व्यवस्थापनाने देखील यात लक्ष घालण्याचे गरजेचे आहे. त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी एखाद्या मुलाला ताप आला असेल तर त्याला लागलीच घरी पाठविणे गरजेचे असल्याचे पालिकेने सांगितले. लसीकरणाबाबत चित्रफीतीच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.