२७ कोटी खर्च करून राज्यातील पहिले भवन उभे राहणार
भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन’ उभे राहणार असून या भवनाचे रविवार २० नोव्हेंबर रोजी भूमिपूजन होणार आहे. जवळपास २७ कोटी रुपये खर्च करून हे बहुउद्देशीय भवन उभे राहणार असून भूमिपूजन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत.
अत्यंत कलात्मक पद्धतीने हे भवन तयार केले जाणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभे राहणारे हे भवन राज्यातील पहिले बहुउद्देशीय भवन ठरणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन असावे अशी आमदार सरनाईक यांची संकल्पना होती व २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरु केले. यासाठी सुरुवातीला जागा मिळत नव्हती. शासकीय जागा किंवा सुविधा भूखंड शोधण्यात आला , पण जागा निश्चित होत नव्हती. आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यामुळे त्यावेळी हे भवन उभारण्यासाठी जागा व या कामासाठी आवश्यक निधी व इतर अनेक अडचणीमुळे हे काम मार्गी लागू शकले नव्हते. त्यातच राज्य सरकारच्या योजनांचे निकष बदलले, अनेक अडचणी आल्या. भवन बांधण्यासाठी योग्य अशी जागा मिळत नव्हती. पण आमदार सरनाईक यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांच्या या अथक प्रयत्न व पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने’अंतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मौजे घोडबंदर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विपश्यना केंद्र, बहुउद्देशीय केंद्र बांधणे या कामास राज्य सरकारने मंजुरी देत त्याचा शासन निर्णय ही प्रसिद्ध केला. आता त्या कामात आणखी काही कामाचा समावेश करण्यात आला आहे.
या भवनासाठी एकूण २७ कोटी निधी खर्च होणार आहे. त्यातील १५ कोटी राज्य सरकार, एक कोटी आमदार निधी तसेच ११ कोटी मीरा-भाईंदर महापालिका असे २७ कोटी रुपये खर्च करून हे भवन तयार होणार आहे, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
असे असेल सांस्कृतिक भवन
मीरारोड येथे न्यायालय इमारतीच्या शेजारीच हे सांस्कृतिक भवन उभे राहणार आहे. या सांस्कृतिक भवन इमारतीमध्ये मंगल कार्यालय म्हणजेच मंगल कार्य होण्यासाठी मोठा हॉल, विपश्यना हॉल, प्रदर्शन हॉल, ग्रंथालय, मिनी थिएटर, कॉन्फरन्स रूम, कॅफे एरिया, लिफ्ट अशा सर्व सुविधा असतील. राज्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते-कार्यकर्ते जर मीरा-भाईंदर शहरात आले तर त्यांच्या विश्रामाची व्यवस्थाही भवनात केली जाईल. त्याचप्रमाणे या आंबेडकर भवनाच्या प्रांगणात पाच फूट उंचीच्या चबुतऱ्यावर, १० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची नागरिकांची मागणीही आमदार प्रताप सरनाईक यांनी मान्य करत प्रशासनाला त्या कामाचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे याच सांस्कृतिक भवनात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रही सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
रविवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आधी भवनाचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात पुढील कार्यक्रम होणार आहे. यावेळी रामदास आठवले तसेच रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार असून प्रसिद्ध मराठी गायक नंदेश उमप यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील सर्वच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारे, त्यांचे विचार जोपासणारे समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.