बीएसयुपी, रेंटलमधील घरांची होते परस्पर विक्री?

नागरीकांनी सावधान राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

ठाणे : ठाणे महापालिकेकडील बीएसयुपीची घरे परस्पर विक्री करणे, किंवा रेंटलची घरे दुसऱ्यांना भाड्याने देणाऱ्या तसेच रेंटलच्याच घरांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत डायघर असेल किंवा वर्तकनगर भागातील पालिकेची रेंटलची घरे तसेच बीएसयुपीची घरे ही महापालिकेची कोणताही परवानगी न घेता, पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नावांचा वापर करुन ती परस्पर विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या विरोधात काही राजकीय पक्ष रस्त्यावर देखील उतरले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील झाली होती. परंतु डायघरमधील घटनेनंतर एक मोठे रॅकेट या प्रकरणात पालिकेतील अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले होते. त्यानुसार डायघर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे देखील झाले होते. तसेच चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशाच स्वरुपाचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आणला गेला होता. वर्तकनगर भागातील रेंटलच्या घरांच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार पुढे आला होता. या प्रकरणातही पालिका अधिकाऱ्यांची खोटी नावे वापरुन घरांची विक्री करणे तसेच बाधित नागरीकांनी आपली घरे दुसऱ्यांना भाड्याने देण्याचे प्रकार समोर आले होते. या प्रकरणी देखील वर्तक आणि चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा या उद्देशाने ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने ठाणेकरांना जाहीर आवाहन केले आहे. त्यानुसार नागरीकांनी तसेच प्रकल्प, रस्ता रुंदीकरण बाधीत नागरीकांनी अशा व्यक्तींच्या भुलथापांना बळी पडू नये असे आवाहन स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधिक्षक महेश आहेर यांनी केले आहे.