फेरीवाला कर्ज योजनेसाठी ठामपाला ११२३७ अर्जांचे लक्ष्य

ठाणे : पीएम स्वनिधी या फेरीवाला कर्ज योजनेसाठी ठाणे महापालिका क्षेत्राला ११२३७ अर्जांचे लक्ष्य देण्यात आलेले आहे. ठाण्यासारख्या शहरासाठी हे लक्ष्य मोठे नाही. त्यामुळे सर्व सहाय्यक आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घालून हा टप्पा लवकरात लवकर पार करावा, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतेच दिले.

पीएम स्वनिधी ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याबाबत मुंबईत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन उद्दिष्टपूर्तीबद्दल सूचना दिल्या.

डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम स्वनिधीच्या लाभार्थीना १० हजार रुपयांचे वितरण होणार आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. पीएम स्वनिधी योजेनेची प्रगती, त्यातील अडचणी, उपाययोजना यांचा आढावा घेणारी बैठक आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपायुक्त वर्षा दीक्षित, पीएम स्वनिधी योजनेचे ठाण्याचे लीड मॅनेजर श्री. भारती, सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

‘स्वनिधी से समृध्दी तक’ या दुसऱ्या टप्प्यात ठाण्याची कामगिरी चांगली आहे. त्याची शिबिरे दर आठवड्याला घेतली जावीत. फेरीवाल्यांना डिसेंबर २०२४ पर्यंत पहिल्या टप्प्यात १० हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात ८० हजार रुपये मिळू शकतील. आताच्या काळात कोणत्याही हमी शिवाय असे कर्ज मिळणे अशक्य आहे. म्हणूनच जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. बांगर यांनी केले.

प्रत्येक प्रभाग समितीतून किमान २ हजार अर्ज यावेत. तसेच, यापूर्वी नाकारण्यात आलेल्या अर्जांचाही पुनर्विचार करावा. यापूर्वी बँकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज फेटाळले होते. मात्र, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सूचना दिल्यानंतर  बदललेल्या नियमांमुळे आता जुन्या अर्जातील काही जण पात्र ठरू शकतील, असेही श्री. बांगर यांनी नमूद केले.