काळजी नाही जोवर; फोफावणार गोवर!

* मुंबई, भिवंडीपाठोपाठ ठाण्यात साथ
* स्वच्छता आणि लसीकरणावर भर देण्याचे आवाहन

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्येही गोवर आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिनाभरात भिवंडी शहरात सर्वाधिक ३७ तर, ठाणे शहरात १० रुग्ण आढळून आले आहेत. स्वच्छता आणि लसीकरणाकडे जोपर्यंत गांभीर्याने पाहिले जात नाही, तोपर्यंत साथीचा धोका कमी होणार नसल्याचे मत तज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा-कौसा आणि भिवंडी महापालिका क्षेत्र या मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण सर्वाधिक असून याठिकाणी गोवर रुबेला लसीकरण सत्र आयोजित करण्याबरोबरच सामाजिक संस्था आणि धर्मगुरु मौलाना यांच्या माध्यमातून लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये वर्षभरात गोवर आजाराचे १८५ संशियत रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १८५ रुग्णांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथील हाफकीन रिसर्च इन्स्टीट्यूट येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात गोवरचे २८ तर रुबेला गोवरचे ५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ऑक्टोबर महिन्यात १० गोवरचे आणि पाच रुबेला गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये एक वर्षाच्या आतील चार, १ ते ५ वर्षापर्यंत १३ आणि उर्वरित ११ रुग्ण पाच वर्षांच्या पुढील आहेत. २८ पैकी ७ रुग्णांनी प्रतिबंधित लशीच्या दोन मात्रा तर ३ रुग्णांनी प्रतिबंधित लशीची एक घेतली आहे. १८ रुग्णांनी एकही मात्रा घेतलेली नाही. २८ पैकी बहुतांश रुग्ण हे मुंब्रा-कौसा भागातील असल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली आहे.

नोव्हेंबर महिन्यात पाच संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथील हाफकीन रिसर्च इन्स्टीट्यूट येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. रुग्ण बाधीत क्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण सुरू केले असून त्यात ते ताप आणि अंगावर चटे असलेल्या संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेत आहेत. याशिवाय विशेष गोवर रुबेला लसीकरण सत्र आयोजित करण्याबरोबरच सामाजिक संस्था आणि धर्मगुरु मौलाना यांच्या माध्यमातून लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. राणी शिंदे यांनी दिली.

भिवंडी शहरात या आजाराचे २७१ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये १०९ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन हाफकीन इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आले असून ३७ रुग्ण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

ग्रामीण भागात १३ संशयित असून दोन रुग्ण बाधित सापडले आहेत. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या पालिका क्षेत्रात एकही संशयित तसेच बाधीत रुग्ण आढळून आलेला नसल्याचा दावा संबंधित पालिकेच्या आरोग्य विभागांनी केला आहे.

गोवरचे जंतू हे हवेतून पसरतात. या विषाणूचे संक्रमण हवेमधून होते. स्वच्छ पाण्याने सतत हात धूत राहावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, कोणाला ताप असल्यास लहान मुलांना त्यांच्यापासून लांब ठेवावे, सगळ्यात महत्वाचे म्हणजे लहान मुलांचे वेळेच्या वेळी लसीकरण करणे. बाळ जेव्हा नऊ महिन्याचे आणि १५ महिन्याचे असते तेव्हा लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असे बालरोग तज्ज्ञ डॉ.संदीप केळकर यांनी सांगितले.