भिवंडीत ‘गोवर’चा उद्रेक

३७ रुग्ण बाधित

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात गोवर रुबेला आजाराचे २७१ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १०९ रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ३७ रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचे अहवाल प्राप्त झालेला आहे.

सदर रुग्ण बाधीत कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करून संशयीत रुग्णांना व्हीटामिन ए चा पहिला डोस व २४ तासानंतर दुसरा डोस देण्यात आले. तसेच ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील ज्या लाभार्थ्यांनी गोवर रुबेलाचा डोस घेतलेला नाही अशा लाभार्थ्यांना गोवर रुबेला डोस दिला जात आहे.

गोवर बाधीत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांनी गोवर रुबेलाचा एकही डोस घेतलेला नाही, असे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. सदर ठिकाणी आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत विशेष गोवर रुबेला लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत आहे. गोवर रुबेला आजाराचे वाढते रुग्ण लक्षात घेता गोवर रुबेला आजारावर नियंत्रण, उपाययोजना व विचार विनिमय करणेकरीता खाजगी बालरोग तज्ञ, सामाजिक संस्था, शिक्षण विभाग,अंगणवाडी पर्यवेक्षक, तसेच धर्मगुरु मौलाना यांची बैठक घेण्यात आली आहे.