दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल
ठाणे : किसननगर येथील भटवाडी भागात ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्याबाहेरही दोन्ही गटात जुंपल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किसननगर ही राजकीय कर्मभूमी आहे. येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील उपस्थित होते. याच दरम्यान शिंदे गटाचे माजी नगरसेवक योगेश जानकर त्याठिकाणी आले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी दोन्ही गटात वाद झाला. या वादात ठाकरे गटाचे दोन पदाधिकारी जखमी झाले. राजन विचारे आणि दिघे यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढले. या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता.
त्यानंतर राजन विचारे हे श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे देखील त्या ठिकाणी आले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या. त्यानंतर दोन्ही गटांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस ठाण्याबाहेरही दोन्ही गट समोरासमोर आल्याने पोलिसांनी दोन्ही गटावर लाठीमार केला आणि जमाव पांगवला.