24 904 प्रकरणे निकाली
ठाणे: ठाणे जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित 22,393 आणि 2511 दावा दाखल पूर्व प्रकरणे अशी मिळून एकूण 24,904 प्रकरणांमध्ये पक्षकारांच्या सामंजस्याने तडजोड होऊन निकाली निघाली आहे. या लोकअदालतीमध्ये एकूण 13,23,04,99,168 रक्कमेची तडजोड झाली असल्याची माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये 12 नोव्हेंबर 2022 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली “राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयातील वाढता ताण लक्षात घेता प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आवश्यक आहे. केवळ प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्याने पक्षकारांस तात्काळ न्याय मिळतो व न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होतो, यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये प्रकरणे ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध न्यायालयांमधील प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ती निकाली निघाली असल्याचे श्री. सुर्यवंशी यांनी दिली.
ठाण्यातील मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाकडील प्रलंबित प्रकरणांमध्ये मयत व्यक्तीच्या वारसांना जास्तीत जास्त मोटार अपघात नुकसान भरपाई मंजुरीसाठी जिल्हा न्यायाधीश पी. एस. विठलाणी यांनी पॅनल प्रमुख म्हणून विशेष प्रयत्न केले. 265 मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड होऊन पिडितांना एकूण 21 कोटी 90 लाख 69,675 रुपये इतकी भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यापैकी ठाणे मुख्यालयातील 204 प्रकरणांत 18 कोटी 21 लाख 12015 रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असल्याचे श्री. सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.
भिवंडी निजामपूर महानगर पालिका हद्दीतील जागेच्या मावेजाची 17 प्रकरणे सन २००० पासून प्रलंबित होती. या प्रकरणांवर ठाणे दिवाणी न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. एन. शाह यांच्या पॅनेलने तडजोड घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच त्या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री आणि जिल्हा न्यायाधीश-१ ए.एम. शेटे यांनी मध्यस्थी भूमिका म्हणून पार पाडली. या सर्व प्रकरणांत लोकअदालतमध्ये तडजोडीस यश प्राप्त झाले असून 22 वर्ष जुनी भूसंपादन प्रकरणे कायमची निकाली निघाली आहेत. विशेष बाब म्हणजे हक्कदार व मुखत्यारधारक श्री. काझी हे ९७ वर्ष वयोवृध्द आहेत. या प्रकरणाच्या तडजोडीसाठी भिवंडी येथील काझी वकील, शासनातर्फे वकील विवेक कडू आणि महानगर पालिकेचे वकील अरुण नवरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. सुर्यवंशी यांनी दिली.
प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात ठाणे जिल्हा राज्यात अग्रेसर असून या राष्ट्रीय लोकअदालतध्ये कॅनडा, अमेरिकेमधील पक्षकारांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती दर्शवली. या अदालतीमध्ये वैवाहिक प्रकरणे तडजोडीस मोठ्या प्रकरणात यश आले असून अनेक संसार जुळले. १० ते १५ वर्ष जुनी असंख्य प्रकरणे निकाली निघाली. २२ वर्ष जुन्या भूसंपादनाच्या एकूण १७ प्रकरणांत तडजोड होऊन भूधारकास नुकसान भरपाई देण्यात आली.