‘बिझनेस जत्रा’चे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
ठाणे : ‘महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी परदेशी आणि मोठे गुंतवणूकदार स्वत:हून तयार होतील, अशी परिस्थिती निर्माण करणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ठाण्यात झालेल्या ‘बिझनेस जत्रा’त दिले. ‘नोकरदार नाही, तर दाता’ बनण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
‘ठाणे लक्ष्यवेध’ आयोजित व कॅम्पेन पार्टनर ‘अॅडमार्क मल्टी व्हेंचर’च्या सहयोगाने ‘बिझनेस जत्रा’ या व्यवसायिक मेळाव्याचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
सामंत यांनी नव्या उद्योजकांचे यावेळी कौतूक केले तसेच बाहेर राज्यातील उद्योग आपल्या राज्यात कसे येतील, यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन उद्योगांना खादी ग्रामोद्योग, एमएसएमइ आणि मुख्यमंत्री रोजगार योजना या योजनांच्या अंतर्गत सर्व ती मदत करण्याचे वचन त्यांनी दिले. महाराष्ट्रात नवीन उद्योग येण्याच्या मार्गावर असून लवकरच या संदर्भात घोषणा कोणत्याही क्षणी होईल. त्यामुळे महाराष्ट्राचे हित साधले जाईल असेही मंत्र्यांनी सांगितले.
तत्पूर्वी निष्णात करिअर मार्गदर्शक आणि अर्थतज्ज्ञ ललित गांधी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यमान शिंदे-फडणवीस युती सरकारच्या एकंदर कामगिरीचे आणि विशेषत: उद्योग धोरणाचे कौतुक केले. उद्योगांची कर परताव्याची गेल्या कित्येक वर्षांपासून थकलेली थकबाकी या युती सरकारने उद्योजकांना परत केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.
यावेळी उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते ‘अॅडमार्क मल्टी वेंचर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गणेश दरेकर यांच्यासह नऊ मान्यवर आणि होतकरु उद्योजकांचा ‘विशेष लक्षवेधी उद्योजक’ हा पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. उद्योगमंत्र्यांनी जत्रेत फेरफटका मारून उद्योजकांशी चर्चा केली. हा मेळावा शुक्रवारी पार पडला. शनिवारी, 12 नोव्हेंबर रोजीही ठाणे येथे होणार आहे.
या मेळाव्याचे यंदाचे दुसरे वर्ष असून १० हजारांहून अधिक विविध क्षेत्रातील व्यावसायिक येथे दोन दिवसात भेट देणार आहेत. या मेळाव्याचे मुख्य प्रयोजक ‘ई-जॉय बाईक’ असून उप प्रायोजक पितांबरी, क्विक शेफ, स्नॅक बडी व धन्वंतरी केरला हे नामवंत ब्रँड आहेत. बिझनेस जत्रेमध्ये 125 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. यात ‘बी-टू-बी आणि बी-टू- सी’ या दोन्ही प्रकारच्या व्यवसायांचा समावेश आहे. ‘लक्ष्यवेध’ च्या बिझनेस जत्रा मेळाव्यात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून त्यात विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर भाषणे होणार आहेत.