पाच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या; तिघांना स्थगिती

ठाण्यात बदल्या-स्थगितीनाट्य

ठाणे: ठाणे पोलीस दलातील पाच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या काल राज्य सरकारने केल्या होत्या, परंतु आज अचानक त्यापैकी तीन जणांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याने पोलीस दलात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

परिमंडळ एकचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांची मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय येथे परिमंडळ चारचे उपायुक्त प्रशांत मोहिते यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे येथे बदली करण्यात आली होती. आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुनिल लोखंडे यांची नागपूर पोलिस दलात परिमंडळ दोनचे उपायुक्त योगेश चव्हाण यांची नवी मुंबई येथे विशेष शाखा आणि वाहतूक पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे या पाच उपायुक्तांची बदली काल करण्यात आली होती. त्यांच्या जागी नवी मुंबई येथील रुपाली खैरमोडे, शिवराज पाटील, फोर्स वनचे अमरसिंह जाधव यांची बदली करण्यात आली होती, परंतु आज राज्य सरकारच्या गृह विभागाने योगेश चव्हाण, सुनिल लोखंडे आणि प्रशांत मोहिते यांच्या बदल्यांना आज स्थगिती देण्यात आली.

पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये १५ दिवसांपूर्वी नाराजी नाट्य झाले होते. त्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रोखण्यात आल्याचे बोलले जात होते. त्या यादीतील हे अधिकारी तर नाहीत ना, अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे.