कृषिमंत्री सत्तार यांच्या निषेधार्थ अंबरनाथला राष्ट्रवादीची निदर्शने

अंबरनाथ : कृषिमंत्री अब्दुल सत्तार  यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याच्या निषेधार्थ अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मंगळवारी घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. त्याचे पडसाद अंबरनाथला देखील उमटले. आज मंगळवारी सकाळी शहराध्यक्ष सदाशिव पाटील व महिला शहराध्यक्ष पुनम शेलार यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री सत्तार यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करत जाहीर निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे, महिला जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, प्रदेश सरचिटणीस किसन तारमळे, महिला प्रदेश सरचिटणीस प्रिसिला डिसिल्वा, माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील,  गणेश गायकवाड, कमलाकर सूर्यवंशी, श्री. साबे, महाजन बुवा, अविनाश देशमुख, युवक अध्यक्ष प्रमोद बोराडे, युवती अध्यक्ष गौतमी सुर्यवंशी, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.