भाजपच्या ‘निदान रेषेला’ स्पर्श करण्याआधीच शिंदे गटाचा ‘खो’

एका फोनमुळे ५०हून जास्त जणांचे भाजप प्रवेश रद्द?

ठाणे: राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे सरकार असले तरी ठाण्यात मात्र पालिका निवडणुका आणि पक्ष प्रवेश यावरून कबड्डी आणि खोखो सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ठाण्यात असताना शिंदे गटातील अनेकांचे प्रवेश भाजपात होणार होते, मात्र मुख्यमंत्र्यांची नाराजी नको म्हणून हे प्रवेश रद्द झाल्याची चर्चा आहे.

शिंदे गटाच्या इच्छुकांचेही भाजपमध्ये स्वागत आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले असले तरी प्रत्यक्षात मात्र शिंदे गटाच्याच एका वजनदार नेत्यामुळे इतर पक्षातील इच्छुकांचा भाजप प्रवेश आयत्यावेळी रद्द झाल्याचे समोर आले आहे. दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नीचा भाजप प्रवेश होणार होता. तशी तयारीही करण्यात आली होती. पण एक फोन फिरला आणि स्थानिक भाजप नेत्यांचे प्रयत्न वाया गेले. दिव्यातूनही शिंदे गटातील अनेकांचे प्रवेश होणार होते.

मनसेचे दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घनिष्ठ संबंध होते. म्हणूनच अनेक वर्षे अपक्ष म्हणून आणि शेवटच्या कारकिर्दीच्या काळात मनसेच्या तिकिटावर सुधाकर चव्हाण निवडून आल्यानंतरही हे संबंध तसेच होते. म्हणूनच त्यांच्या गळ्यात स्थायी समिती सभापती पदाची माळही घालण्यात आली होती. पण ठाणे महालिकेच्या गेल्यावेळच्या निवडणुकीत सुधाकर चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नीसह पूर्ण पॅनल येथे जिंकले. पण संबंधांमध्ये कटूता आली नाही. म्हणूनच मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी सुधाकर चव्हाण यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर पत्नीसाठी प्रभागात एक जागा राखीव ठेवण्याची विनंतीही केली होती.

सुधाकर चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नीने पालिका निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. ही संधी साधत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी स्थानिक नेतेमंडळींनी पूर्ण फिल्डींगही लावली. या पक्षप्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ठाणे दौर्‍याचा मुहूर्त निवडण्यात आला. पण शिंदे गटाच्या एका वजनदार नेत्याचा फोन बावनकुळे यांना गेला आणि तो पक्षप्रवेश रद्द झाला. केवळ ठाण्यातच नव्हे तर दिव्यातही शिंदे गटाच्या एका नगरसेवकासह अनेकांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी केली होती.

दरम्यान मुख्यमंत्र्यांना दुखवायचे नाही असा पवित्रा उपमुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे हा पक्षप्रवेशही बारगळला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.