विमान प्रवासासाठीही ‘बेस्ट’चे आगाऊ तिकीट आरक्षण

‘बेस्ट चलो अ‍ॅप’ चा वापर करण्याचे आवाहन

ठाणे : प्रवाशांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणा-या बेस्ट उपक्रमाने विमान प्रवाशांसाठी ठाण्यापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून दक्षिण मुंबईपर्यंत व नवी मुंबईपर्यंत वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवा सुरु केली आहे. या बससेवेचे आगाऊ आरक्षण करण्यासाठी उपक्रमाने ‘बेस्ट चलो अ‍ॅप’चा वापर करण्याचे आवाहन केले. आसन आरक्षणाबरोबरच  प्रवासी भाड्याची सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

एअरपोर्ट सेवेची बसगाडी कोणत्या बसथांब्यांवर उपलब्ध होणार  आहे, हे प्रवाशांना समजण्यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे विशिष्ट पद्धतीचे स्टिकर्स संबंधित बसथांब्यांवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. विमान प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने उपक्रमाने थेट अ‍ॅरायव्हल आणि डिपार्चर’ प्रवेशद्वारांपाशीच बससेवा उपलब्ध करुन दिली आहे. या सेवेच्या बसगाड्यांवरील बसचालकांना प्रवासी कोणत्या बसथांब्यांवर बसगाडीच्या प्रतिक्षेत आहेत,  याची माहिती ‘अ‍ॅप’द्वारे मिळते. बसचालक संबंधित थांब्यांवर बस थांबवून प्रवासी गाडीत घेऊ शकतात व प्रवासी त्यांच्या मोबाईल अ‍ॅप’द्वारे आसन  आरक्षित केलेल्या बसगाडीचे ठिकाण स्वत:च्या मोबाईलवर पाहू शकतात.

छत्रपती शिवाजी महाराज आंतर्देशिय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणा-या एसी बससेवेचा २४ बाय ७ (२४ तास) फायदा प्रवाशांना  होणार आहे.  एअरपोर्ट सेवा १ बॅकबे आगारापासून सुरु होणार  आहे. एअरपोर्ट सेवा २ (८८२) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते जलवायू विहार खारघर मार्गे धावणार असून, त्याचे किमान ५० आणि कमाल भाडे २५० रुपये आणि बससेवा एका तासाच्या अंतराने उपलब्ध आहेत.

एअरपोर्ट सेवा ४ / ८८४९ ही सेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ठाणे कॅडबरी या मार्गावर धावणार  आहे.  या सेवेचे किमान प्रवासभाडे ५० रुपये आणि कमाल प्रवासभाडे १५० रुपये आहे आणि बसगाड्या एका तासांच्या अंतराने उपलब्ध आहेत. या बससेवेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-वेअर हाऊस-आंतरराष्ट्रीय विमानतळ-वेअर हाऊस-डॉ. दत्ता सामंत चौक (साकीनाका)-डॉ. आंबेडकर उद्यान (पवई)- आयआयटी मार्केट- गांधीनगर-जोगेश्वरी-विक्रोळी  जोडमार्ग-भाडूप गाव-भाडूप उदंचन केंंद्र-मुलुंड मिठागर-मॅरथॉन चौक (तीन हात नाका)-लुईसवाडी आणि कॅडबरी जंक्शन असा आहे.